नागपूर : नागपूर जिल्ह्यातील परशिवणी तालुक्यात मुले चोरणारी महिला असल्याचा संशयावरून जमावकडून मारहाण होत असलेल्या महिलेला दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी मोठ्या हिमतीनं वाचवलंय. जयश्री रामटेके असे या वाचलेल्या महिलेचे नाव असून ती नागपूरच्या जरीपटका भागातल्या हुडको कॉलनीमध्ये राहते. पक्षाघात झालेल्या रोग्यांना ती तेल मालिश करण्याचे काम करते. पारशिवनी तालुक्यातील करंभाड गावात ही महिला वस्तीतून बुधवारी जात असताना बाजूला लहान मुले खेळत होती. तेवढ्यात मुलांनी जयश्रीची वेशभूषा पाहून चोर - चोर ओरडण्यास सुरवात केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुलांच्या आवाजाने परिसरातील महिला-पुरुष गोळा झाले. त्यांनी जयश्रीला घेरून प्रश्न विचारण्यास सुरवात केली. मात्र सध्या मुले चोरणाऱ्या अफवा असल्याने जमावाने तीला मारहाण करण्यास सुरुवात केली. अशात घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यावर सहायक पोलीस उपनिरीक्षक दिलीप आगरकर आणि महिला पोलीस कर्मचारी संगीता या घटना स्थळावर पोहचल्या. घटनास्थळावर सुमारे दोनशे जणांचा जमाव होता. अशात महिला पोलीस कर्मचारी संगीता यांनी जमावाच्या तावडीतून जयश्रीला आपल्या ताब्यात घेतले. नंतर पोलीस दिलीप आगरकर यांनी आपल्या बाईकवर बसवून पोलीस स्टेशनला आणले. 



केवळ अफवेमुळे धुळ्यात 5 जणांना अत्यंत निर्दयीपणे मारल्याची घटना ताजी असताना तशाच घटनेची पुनरावृत्ती नागपुरात घडण्यापासून केवळ 2 पोलीस कर्मचाऱ्यांनी रोखली.