PM Modi Mumbai Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) पुन्हा एकदा मुंबई दौऱ्यावर (Mumbai Visit) येणार आहेत. 10 फेब्रुवारी रोजी नरेंद्र मोदी मुंबईत येणार असून या पार्श्वभूमीवर जोरदार तयारी सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अंधेरी पूर्वमधील मरोळ बोहरा कॉलनीमध्ये बोहरा मुस्लीम समाजाकडून उभारण्यात आलेला अल जमिया तस सैफिया (AL JAMAIA TUS SAIFIYA) या विद्यापीठाचं उद्घाटन करण्यात येणार आहे. नरेंद्र मोदींच्या दौऱ्यासाठी अद्याप 10 दिवस शिल्लक असले तरी पोलिसांनी मात्र आतापासून सुरक्षेची तयारी सुरु केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत येणार असल्याने पोलिसांनी कडक सुरक्षाव्यवस्था ठेवण्याची तयारी सुरु केली आहे. मरोळमध्ये मोठ्या प्रमाणात मुस्लिमांची वस्ती आहे. तसंच तिथे आजुबाजूला झोपडपट्टी असल्याने सुरक्षेचा मुद्दा महत्त्वाचा आहे. त्यामुळे पोलिसांनी आतापासून सुरक्षेचा आढावा घेण्यास सुरुवात केली असून त्यादृष्टीने पाहणी केली जात आहे. स्वत: पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यामध्ये लक्ष घालत आहेत. मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी रविवारी बोरी कॉलनीमध्ये सुरक्षेची पाहणी केली. 


सीएसएमटी येथून वंदे भारतला हिरवा झेंडा दाखवण्याची शक्यता 


दरम्यान सीएसएमटी-साई नगर शिर्डी आणि सोलापूर-सीएसएमटी दरम्यान दोन वंदे भारत एक्स्प्रेस चालवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी १० फेब्रुवारीला सीएसएमटी येथून वंदे भारतला हिरवा झेंडा दाखवण्याची शक्यता आहे. वंदे भारत एक्स्प्रेसमुळे मुंबई ते सोलापूर हा प्रवास केवळ साडे सहा तासांमध्ये पूर्ण करता येणार आहे. सध्या सिद्धेश्वर एक्स्प्रेसला मुंबई ते सोलापूर अंतर कापण्यासाठी आठ तास लागतात. तसेच सीएसएमटी-साई नगर शिर्डी वंदे भारत एक्स्प्रेसमधूनही पाच तास ५५ मिनिटांचा प्रवास होणार आहे.


मोदींचा महिन्याभरात दुसरा मुंबई दौरा


19 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावर आले होते. यावेळी वांद्रे- कुर्ला संकुलात सुमारे ४० हजार कोटींच्या विकासकामांचा प्रारंभ, तसेच मेट्रो रेल्वे प्रकल्पांच्या लोकार्पणाच्या माध्यमातून पंतप्रधान मोदी यांनी आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराचं रणिशग फुंकलं. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजना आणि फेरीवाले व छोटय़ा दुकानदारांना पंतप्रधान स्वनिधी योजनेतून अनुदान वाटपही पंतप्रधानांच्या हस्ते झालं. मोदी यांनी दौऱ्याच्या निमित्ताने एकाप्रकारे भाजपा-शिंदे गटाचं जोरदार शक्तिप्रदर्शनच केलं होतं.