नागपूर : एका प्रकरणात माहिती घेण्यासाठी आलेल्या वयोवृद्धांना पोलिसांनी दादागिरी करत शिवीगाळ केल्याचा आरोप नागपूर पोलिसांवर होत आहे. तर आरोपीनेच पोलिसांना शिवीगाळ करीत धक्काबुक्की केल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. याप्रकरणी पोलिसांनी वयोवृद्ध आरोपींविरुद्धच सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केल्यानं आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नागपूरच्या म्हाळगी नगर भागात जयेंद्र गोगटे पत्नी व वयोवृद्ध आईवडिलांसह राहतात. एका प्रकरणात माहिती घेण्यासाठी दोन व्यक्ती गोगटे यांच्या घरी आल्या त्यावेळी घरात असलेल्या जयेंद्रच्या आई वडिलांना त्या व्यक्तींनी शिवीगाळ करीत जयेंद्र कुठे आहे अशी विचारणा केली. 


स्वतः पोलीस आहोत, असं सांगत कडक शब्दात विचारणा केल्यावर घाबरलेल्या आई-वडीलांनी जयेंद्रला बोलावलं. आई वडिलांशी असं असभ्य वर्तन पाहून जयेंद्रने खरच त्या व्यक्ती पोलीस आहेत की नाही याची खातरजमा करण्यासाठी त्यांचं ओळखपत्र मागितलं. 


मात्र ओळखपत्र मागणारा तू कोण अशा शब्दात जयेंद्र याला देखील दमदाटी करण्यास सुरवात केली आणि दोघांमध्ये बाचाबाची झाली. साध्या वेशात असल्यानं त्यांच्याकडे ओळखपत्राची मागणी केली मात्र त्या कर्मचा-यांना त्यांचा अपमान वाटला म्हणून पोलिसांनी सूडबुद्धीनं आपल्यावरच गुन्हा दाखल केल्याचा आरोप जयेंद्र गोगटे यांनी केला आहे.