सोलापूर : पोलिसाच्या पत्नीवर पोलीस शिपायानेच बलात्कार केल्याची धक्कादायक घटना सोलापुरात घडली आहे. महिलेचा पोलीस पती कोरोना पॉझिटिव्ह असल्याने याची संधी साधत पोलीस शिपायाने बलात्कार केल्याचा आरोप पीडित पोलीस पत्नीने केलाय. तसेच, याप्रकरणी पीडित महिलेने फौजदार चावडी पोलीस ठाणे येथे फिर्याद दाखल केली आहे. रवी मल्लिकार्जुन भालेकर असे गुन्हा दाखल झालेल्या पोलीस शिपायाचे नाव आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आरोपी रवी भालेकर हा सोलापूर शहर पोलिसात पोलीस शिपाई पदावर कार्यरत आहे. यापूर्वी तो सोलापूर शहर वाहतूक शाखेत कार्यरत होता. तर पीडित महिलेचा पती आणि आरोपी रवी दोघेही एकाच खात्यात होते. तसेच दोघांचे कुटुंब राहण्यास देखील एकाच पोलीस वसाहतीत होते. यातूनच आरोपी आणि पीडितेच्या परिवाराची ओळख निर्माण झाली होती. 


याच ओळखीतून आरोपी पीडितेशी लगट करण्याचा प्रयत्न करत होता. तसेच वारंवार पीडितेच्या घरी जाऊन बोलण्याचा प्रयत्न करत होता. तसेच मोबाईलवर मेसेज करत होता. अशी तक्रार पीडित महिलेने दिली आहे. दरम्यान 23 एप्रिल रोजी पीडित महिलेचे पती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे त्यांना कोरोना सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. हीच संधी साधत रात्री उशीरा आरोपी रवी पीडितेच्या घरी गेला. 


आरोपी रवी याने घरात जात दाराची कडी लावली तसेच माझे तुझ्यावर प्रेम आहे. तू मला आवडते. गोंधळ केल्यास तुझीच बदनामी होईल, असे म्हणत तिच्याबरोबर जबरदस्तीने शारिरीक संबंध ठेवल्याचा आरोप पीडितेने केला आहे. पीडित महिलेच्या तक्रारीनंतर फौजदार चावडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


दरम्यान गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी पोलीस शिपाई रवी भालेकरला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसानेच आपल्या सहकारी पोलिसाच्या पत्नीवर बलात्कार केल्याच्या घटनेने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. पोलीस दलात या घटनेबाबत उलट सुलट चर्चा सुरू आहे. सोलापुराती फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद असून घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.