डीएसकेंना कोणत्या क्षणी अटक, पण ते आहेत तरी कुठे?
मुंबई उच्च न्यायालयानं अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर आता डीएसकेंच्या अटकेसाठी पुणे पोलिसांनी हालचाली सुरू केल्या आहेत.
पुणे : मुंबई उच्च न्यायालयानं अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर आता डीएसकेंच्या अटकेसाठी पुणे पोलिसांनी हालचाली सुरू केल्या आहेत. पुणे पोलीस डीएसकेंच्या मागावर असून त्यांच्या अटकेसाठी तीन पथकं तयार करण्यात आली आहेत. मात्र, डीएसके आहेत तरी कुठे असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
कोणत्याही क्षणी अटक
डीएसकेंना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. आजच्या सुनावणीत उच्च न्यायालयानं डीएसकेंना खडेबोल सुनावले. तसंच डीएसकेंमुळं न्यायालयावर गुंतवणूकदारांची माफी मागण्याची वेळ आली. दिरंगाई झाल्यामुळे माफी मागत असल्याचं न्यायालयानं गुंतवणूकदारांना सांगितलं. तसंच डीएसकेंचा पासपोर्ट जप्त करण्याचे आदेश उच्च न्यायालयानं केंद्र सरकारला दिलेत. त्याचबरोबर बुलढाणा अर्बन बॅंकेलाही कोर्टानं फटकारलंय.
डीएसकेंचा खोटारडेपणा
डिएसके यांची संपत्ती विकत घेऊन त्यांना १०० कोटी रुपये देण्याची तयारी बुलडाणा अर्बन बँकेनं दाखवली होती. पण मुळात जी संपत्ती डीएसके यांनी बुलढाणा अर्बन बॅंकेला सादर केली होती. ती सगळी संपत्ती आधीच महाराष्ट्र बॅंकेकडे गहाण होती. या प्रकरणाची पुढची सुनावणी १ मार्चला होणार आहे.