Maharashtra Assembly Elections : कोकणात ठाकरे गटाकडून जोरदार मोर्चेबांधणी, या नावांची चर्चा
Ratnagiri Assembly Elections : ठाकरे गटाचे आजही कोकणात वर्चस्व कायम आहे. स्थानिक पातळीवर ठाकरे गटाच्या शिवसेनेचे वर्चस्व कायम आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये ठाकरे गटाची सत्ता आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात ठाकरे गटाची ताकत चांगली आहे. मात्र, रत्नागिरी मतदारसंघाचा विचार केल्यास उदय सामंत यांचे वर्चस्व दिसून येत आहे.
Ratnagiri Assembly Elections : कोकणात ठाकरे गटाकडून जोरदार मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात झाली आहे. माजी मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या उदय सामंत यांच्याविरोधात उमेदवारासाठी आतापासून शोध सुरु झाला आहे. उदय सामंत हे विद्यामान मंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री आहेत. त्यांना शह देण्यासाठी तगडा उमेदवार रिंगणात उतविण्याच्या हालचाली ठाकरे गटाकडून सुरु आहेत.
रत्नागिरी-संगमेश्वर या उदय सामंत यांच्या विधानसभा मतदारसंघामध्ये राजापूर-लांजा या ठिकाणचे विद्यमान आमदार राजन साळवी यांना विचारणा करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र, आमदार हे राजापुरातूनच इच्छुक आहेत. दरम्यान, पक्षाने आदेश दिल्यास रत्नागिरीमधून देखील लढेन, अशी प्रतिक्रिया गुहागरचे ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी दिलीय. त्यामुळे आता उदय सामंतांविरोधात राजन साळवी लढणार की भास्कर जाधव अशी चर्चा सुरु झाली आहे.
शिवसेनेत उभी फूट पडली तरी कोकणात कार्यकर्त्यांनी ठाकरे यांना सोडचिठ्ठी दिलेली नाही. ही मोठी जमेची बाजू आहे. ठाकरे गटाचे आजही कोकणात वर्चस्व कायम आहे. स्थानिक पातळीवर ठाकरे गटाच्या शिवसेनेचे वर्चस्व कायम आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये ठाकरे गटाची सत्ता आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात ठाकरे गटाची ताकत चांगली आहे. मात्र, रत्नागिरी मतदारसंघाचा विचार केल्यास उदय सामंत यांचे वर्चस्व दिसून येत आहे. त्यांना टक्कर देणारा नेता असेल तर ही निवडणूक चुरशीची होईल. त्यामुळे ठाकरे गटाकडून आतापासून चाचपणी करण्यात येत आहे. भास्कर जाधव यांना उमेदवारी दिली तर सामंत यांनी ही निवडणूक जड जाण्याची शक्यता आहे.
राजापुरात ठाकरे गट भक्कम आहे. तसेच बाळासाहेब ठाकरे यांना मानणारा मोठा मतदार आहे. त्यामुळे राजापूर हा ठाकरे गटासाठी सुरक्षित मतदारसंघ मानला जात आहे. त्यामुळे राजन साळवी हे राजापूर वगळता दुसरीकडून निवडणूक लढविणार नाही, अशीही चर्चा आहे. त्यामुळे गुहागरमधून भास्कर जाधव यांच्या मुलाला आणि भास्कर जाधव यांना रत्नागिरीतून उमेदवारी देण्याचा प्रयत्न होईल, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
दरम्यान, ठाकरे गटाकडून ज्या ठिकाणी उमेदवार नसतील तर स्थानिक पदाधिकाऱ्यांना संधी देण्याची रणनितीही आखण्यात आली आहे. मतदारसंघात ज्याचा चांगला संपर्क असेल त्याला संधी मिळू शकते. शिवसानाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आधी हिच रणनिती आखली होती. ज्यावेळी नवी मुंबईत गणेश नाईक यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी दिली त्यावेळी शाखा प्रमुखाला उमेदवारी दिली आणि ही जागा शिवसेनेने जिंकली होती. माझा शाखाप्रमुखही हरवू शकतो, हे बाळासाहेब ठाकरे यांनी दाखवून दिले होते. हाच निकष ज्या ठिकाणी उमेदवार नसतील तेथे ठाकरे गट वापरण्याची रणनिती आखत आहेत. त्यामुळे ठाकरे गटाला ही निवडणूक जिंकण्यासाठी किती फायदा होतो, हे निवडणुकीनंतरच स्पष्ट होईल.