अश्विनी पवार, पुणे : राज्यातली निवडणुकीची रणधुमाळी शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे. अशातच तरुण मतदारांना आकर्षित करण्यासाठी चक्क मोबाईल गेम्सचाही आधार घेतला जातो आहे. सध्या प्ले स्टोअरवर नरेंद्र मोदी, राहुल गांधी, अरविंद केजरीवाल या बड्या नेत्यांच्या गेम्स उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मोदी रन, राहुल वर्सेस मोदी, मोदी वर्सेस केजरी हे मोबाईल गेम्स सध्या चर्चेत आहेत. मोबाईल गेम्सच्या वाढत्या लोकप्रियतेचा फायदा सध्या प्रचारासाठीही केला जातो आहे. ज्यासाठी या मोबाईल गेम्स निर्मिती केली गेली आहे. 


यामध्ये राहुल गांधी, अरविंद केजरीवाल, नरेंद्र मोदी, या नेत्यांची सत्तेच्या खुर्चीसाठीची स्पर्धा दाखवण्यात आली आहे. आपल्या आवडत्या नेत्याला निवडून हा गेम खेळला जातो. अशा प्रकारे एखाद्या गेमचा प्रचारासाठी वापर होण्याची ही पहिलीच वेळ आहे. 


२०१४ साली सोशल मिडीयाचा पहिल्यांदाच भाजपाकडून मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला. आता तयार करण्यात आलेले मोबाईल गेम ही प्रचाराची पुढची पायरी म्हणता येईल. या गेम्स कोणत्या पक्षाने तयार केल्या आहेत हे अजून पुढे आलेलं नाही. मात्र कुठेतरी आपल्या नेत्याला जिंकून देण्याची मानसिकता या गेम्समुळे अजून बळकट होते आणि त्यामुऴे या गेम्सचा फायदा नेत्यांना अप्रत्यक्षपणे होत असल्याच समाज माध्यम अभ्यासकांचं म्हणणं आहे.


२०११ मध्ये प्रदर्शित झालेल्या सिंघम या सिनेमाच्या प्रमोशनसाठी याच सिनेमाची व्हिडिओ गेम तयार करण्यात आली होते. त्यानंतर सिनेसृष्टीत हा ट्रेंड सुरु झाला. तोच ट्रेंड आता राजकारणतही सुरु झाला आहे. या वर्षीच्या निवडणूकांमध्ये हा ट्रेंड प्रभावीपणे पहायला मिळतो आहे. त्याचा फायदा कोणाला मिळणार हे लवकरच कळेल.