Raj thackeray On Trollers: पत्रकारांवर हल्ले होणे हे अत्यंत निषेधार्थ आहे. पत्रकारांना ट्रोल केले जाते. पण तुम्हाला कोणी ट्रोल केले हे वाचता कशाला? असा प्रश्न मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विचारला. पिंपरी येथील सभेत ते बोलत होते.  मी माझी सभा झाल्यावर काय प्रतिक्रिया आल्या हे पाहत नाही, असे ते म्हणाले. दरम्यान ट्रोल करण्यासाठी राजकीय पक्षांनी लोकं पाळली आहेत असेही ते यावेळी म्हणाले.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सत्तेचा अमरपट्टा कोणी घेऊन येत नाही. सत्ता जेव्हा हातात येते तेव्हा ती जायला सुरुवात झालेली असते. ती किती काळ टिकवायची हे तुमच्या हातात असते, असे ते यावेळी म्हणाले.


राज्यात पत्रकारिता अजुनही जिवंत आहे. असे असले तरी अनेकांना घरी बसून काही कामे नसतात. मागचा पुढचा इतिहास माहिती नसतो. काही लोकं राजकीय पक्षांनी पाळलेली असतात. त्यांना लिहायचे पैसे मिळतात. त्यांचा त्रास करुन घेऊ नका, असे आवाहन त्यांनी पत्रकारांना केले. जे महाराष्ट्राच्या हिताचे आहे, ते लिहिण्याची सध्या गरज आहे, असे आवाहन त्यांनी पत्रकारांना केले.


अनेक पत्रकार मंत्र्यांकडे कामाला लागले आहेत. काही वर्षांपुर्वी हे काम लपून छपून केले जायचे पण आता हे काम खुलेआम केले जाते. लेबल लावून आलेले पत्रकार आम्हाला प्रश्न विचारतात त्यांना आम्ही काय उत्तर द्यायचे? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. 


व्यंगचित्रकार आणि पत्रकार म्हणजे एकच आहे. हे करतानाच मी राजकारणात आलो. 
लहान असताना मार्मिकच्या कार्यालयात जात असे. तिथे अक्षराचे ब्लॉक तयार केले जायचे. तिथपासून ते आतापर्यंतची पत्रकारिता मी पाहिली आहे. मी नववीत असताना माझं पहिलं व्यंगचित्र आलं होतं, अशी आठवण त्यांनी सांगितली. 


1986 रोजी माझ्यावर खुनाचा आरोप झाला. आम्ही घरात बसलो होतो. तेव्हा राज ठाकरे फरार अशी एका सांज दैनिकाची हेडलाइन होती. अशावेळी माझ्यासारखा एकजण उठला आणि कानाखाली दिली तर? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.