आतिश भोईर, झी मीडिया, डोंबिवली : डोंबिवलीकर प्रदूषणाने बेजार झाले आहेत. नागरिक आजारी पडत आहेत. प्रदूषणाने होणाऱ्या आजारांमुळे दवाखाने भरून वाहतायत. प्रदूषित शहरांच्या यादीत डोंबिवलीचा क्रमांक राज्यात अग्रेसर आहे. तरीही प्रदूषण नियंत्रण महामंडळ मात्र ढिम्मं आहे. डोंबिवली हे मध्यमवर्गीय समाजाचं सांस्कृतिक, शैक्षणिक आवड जपणारं शहर. मुंबई चालवणारे सर्वाधिक चाकरमानी कुठे राहतात असा प्रश्न कोणी विचारला तर त्याचं उत्तर असेल डोंबिवली. मुंबईच्या विकासासाठी अक्षरशः रक्ताचं पाणी करणारे डोंबिवलीकर मात्र सध्या गुदमर आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकेकाळी शहराच्या बाहेर असलेली एमआयडीसी आता वस्ती वाढली तशी अगदी शहरातच वसलीय की काय असी शंका यावी. फेज वन आणि फेज टू अशा दोन टप्प्यात ही औद्योगिक वसाहत आहे. इथे इंजिनिअरींग, केमिकल, डाईंग, ऑटोमोबाईल असे विविध कारखाने आहेत. कित्येक उत्पादनांचे स्पेअर पार्ट करून देणारे उद्योग आहेत. मात्र या कारखान्यांमधून मनमानी पद्धतीने प्रदूषणासंदर्भातल्या नियमांची पायमल्ली होते. गेल्या काही दिवसांपासून ठाकुर्ली, खंबाळपाडा, ९० फूट रोड या भागात प्रचंड उग्र वायूचा वास रहिवाशांना त्रास देत आहे. पूर्वी हा वास केवळ रात्री यायचा मात्र आता तर दिवसाच्या कोणत्याही वेळी हा वास त्रास देतो. 


प्रदूषणामुळे नागरिक आजारी पडलेत. एमआयडीसीत नाल्यांच्या ड्रेनेज लाईन जुनाट होऊन अनेक ठिकाणी फुटल्या आहेत. या प्रदूषित सांडपाण्याचाही त्रास सहन करावा  लागतोय. मात्र प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांना कोणताही धरबंध नाही, तसंच त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी प्रशासन ढिम्म आहे. एरवी मोठमोठाल्या गप्पा मारणारे लोकप्रतिनिधीही या समस्येकडे लक्ष देत नाहीत असा स्थानिकांचा आरोप आहे. प्रदूषणामुळे सातत्याने नागरिक आजारी पडत आहेत. घरोघरी श्वसनाचे आजार झालेत. डोळ्यांची जळजळ, घशाचे विकार, सर्दी, ताप, खोकला, डोकं दुखणे याने नागरिक त्रस्त आहेत. 


एमआयडीसीच्या दोन फेजमध्ये मिळून ४०० कंपन्या आहेत. त्यात रासायनिक आणि कापड उद्योग प्रक्रिया करणाऱ्या कंपन्यांची संख्या २५० इतकी आहे. या कंपन्यातून रासायनिक सांडपाणी सोडलं जातं. त्यावर प्रक्रिया करण्यासाठी फेज एक मध्ये १५ दशलक्ष लिटर क्षमतेचं रासायनिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र आहे. तर फेज दोनमध्ये १.५ दशलक्ष लीटर क्षमतेचं रासायनिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र आहे. 


फेज एक मधील रासायनिक सांडपाणी प्रक्रिया केंद्रात कापड प्रक्रिया उद्योगांचे सांडपाण्यावर प्रक्रिया  जाते. तर फेज 2 मधील सांडपाणी प्रक्रिया केंद्रात रासायनिक कारखान्यातून सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाते. या प्रक्रिया केंद्रातून योग्य प्रकारे निकषांच्या आधारे प्रक्रिया केली जात नसल्याप्रकरणी राष्ट्रीय हरीत लवादाकडे वनशक्ती या पर्यावरण संस्थेची याचिका न्यायप्रविष्ट आहे. 


प्रदूषणाचा मुद्दा सतत गाजतो. २०१६ मध्ये प्रोबेस कंपनीत झालेल्या स्फोटात १२ जणांचा मृत्यू झाला होता. डोंबिवलीचं भोपाळ होण्याची शक्यता आहे. या संदर्भात प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी कॅमेऱ्यासमोर आमच्या प्रतिनिधीशी बोलण्यास नकार दिला. डोंबिवली धोक्यात आहे. नागरिक त्रस्त आहेत. डोंबिवलीला मोकळा श्वास देण्याची गरज आहे. नाही तर मोठी हानी झाल्यावर जागं होण्यात काहीच अर्थ नाही.