ठाणे : प्रदूषणामुळे डोंबिवलीतील गुलाबी रस्त्याची राज्यभर चर्चा झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे डोंबिवलीतील प्रदूषणाचा आढावा घेण्यासाठी येणार या शक्यतेने शासकीय अधिकाऱ्यांची एकच धावपळ उडाली. गुलाबी रस्ता झाकण्यासाठी आज या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. रस्त्यावर माती टाकून गुलाबी रस्ता झाकण्याचा केवीलवाणा प्रयत्न सुरु होता. तसेच  रस्त्याशेजारील गटारातून रंगयुक्त झालेले पाणीही पंप लावून उपसण्याचे काम सुरु करण्यात आले. यासाठी सफाई कर्मचाऱ्यांची मोठी फौजच कामाला लावण्यात आली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी डोबिंवलीतील प्रदूषणाची पाहणी केलीच. त्यांच्यासोबत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदेही उपस्थित होते. मुख्यमंत्री स्वतः पाहाणी करण्यासाठी येणार म्हटल्यावर प्रशासन खडबडून जागे झाले आणि अधिकारी चक्क कामाला लागलेत. या अधिकाऱ्यांनी आज चक्क प्रदूषणामुळे गुलाबी झालेले रस्ते स्वच्छ करण्यासाठी सुरुवात केली. गटारातील गुलाबी पाणीदेखील पंप लावून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होते.



तर दुसरीकडे अधिकाऱ्यांकडून स्थानिकांवर दबाव वाढविण्यात येत होता. डोंबिवलीकरांनी आपल्या काही तक्रारी आणि प्रदूषणाच्या तक्रारी मांडू नये, यासाठी पोलीस नागरिकांवर दबाव टाकत असल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांनी केलाय. तसेच एमआयडीसी निवासी भागात राहणाऱ्या नागरिकांना सभा स्थळावरून बाहेर काढल्याचा आरोपही नागरिकांनी केला आहे.