पूजा खेडकर प्रकरणानंतर लोकसेवा आयोग अॅक्शन मोडवर, दिव्यांग उमेदवारांची करणार चौकशी
Pooja Khedkar Case : पूजा खेडकर प्रकरणानंतर आता MPSC अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला जाग आलीय. दिव्यांग उमेदवारांची चौकशी करण्याचा निर्णय आयोगानं घेतला आहे.
Pooja Khedkar Case : पूजा खेडकर प्रकरणानंतर आता महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) अॅक्शन मोडवर आलंय. 2022 मधील राज्यसेवा परीक्षेतील दिव्यांगांच्या तात्पुरत्या निवड यादीतील उमेदवारांची चौकशी होणार आहे. तब्बल 8 जणांची चौकशी केली जाणार आहे. दिव्यांग प्रमाणपत्राचा (Disability Certificate) आधार घेऊन वर्ग दोनची नोकरी मिळवणाऱ्या उमेदवारांची 29 जुलैला चौकशी होणार आहे. दिव्यांग प्रमाणपत्र प्रमाणित करणाऱ्या अधिकाऱ्यांचीही चौकशी होण्याची शक्यता वर्तवली जातेय.
दरम्यान, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयानं (YCM Hospital) वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर (Pooja Khedkar) यांना दिव्यांग प्रमाणपत्र दिलं होतं. त्यासाठी सादर केलेल्या कागदपत्रांवरही आक्षेप असल्यानं प्रमाणपत्र देणाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केलीय.
वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर यांनी दिव्यांग प्रमाणपत्र मिळवण्यासाठी YCM रुग्णालयात आधार कार्ड देखील दिल्याचं समोर आलंय. YCM रुग्णालयाने पूजा यांना 7 टक्के दिव्यांग प्रमाणपत्र दिलं होतं. आधी केवळ रेशन कार्ड दिल्याचंच सांगण्यात येत होतं. मात्र, आता रुग्णालयाचे डीन राजेंद्र वाबळे यांनी पूजा यांनी आधार कार्ड दिल्याचं म्हटलं होतं, ते आधार कार्ड समोर आलंय. दोन्ही ओळख पत्रांवर वेगवेगळा पत्ता आहे.
आधार कार्डवर पुण्यातील नॅशनल हाऊसिंग सोसायटी औंध पुणे इथला पत्ता दिलाय, तर रेशनकार्डवर आळंदी- देहू रस्ता तळवडे येथील कंपनीचा पत्ता दिलाय. पूजाला दिलेलं दिव्यांग प्रमाणपत्र हे खरंच नियमाला धरून देण्यात आलंय का? डॉक्टरांना दिलेली क्लिन चीट यावर प्रश्न निर्माण होतंय. मात्र, खेडकर यांच्या वादानंतर MPSCला जाग आलीय, हेही तितकंच खरंय.
प्रमाणपत्र देणाऱ्या डॉक्टरांना क्लिनचीट
पूजा खेडकर यांना पिंपरी चिंचवड महानगपालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयातून देण्यात आलेल्या दीव्यांग प्रमाणपत्र प्रकरणी कुणीही दोषी नसल्याचे यशवंतराव चव्हाण रुग्णालयाकडून स्पष्ट करण्यात आलंय. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाला या संदर्भात चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार ही चौकशी करण्यात आली होती त्यात कोणीही दोषी नसल्याचं रुग्णालयाने स्पष्ट केलं. अर्ज दाखल करताना सादर केलेली कागदपत्रे तपासण्याची जबाबदारी रुग्णालयाच्या विभागाची नसल्याचे ही रुग्णालयाचे अधिष्ठाता राजेंद्र वाबळे यांनी म्हटलंय
दुसरीकडे, पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर आणि आई मनोरमा खेडकर (Manorama Khedkar) यांचा घटस्फोट हा बनाव असल्याचं समोर आलंय. पुजा खेडकर यांनी आयएएस होण्यासाठी ओबीसी आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी नॉन क्रिमिलेयर सर्टिफिकेट सादर केलं होतं.