Maharashtra Political Crisis: राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी विधानसभा विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा देत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याने महाराष्ट्र हादरला आहे. अजित पवार सरकारमध्ये सहभागी झाल्याने पुन्हा एकदा सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. एकीकडे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलेलं असताना दुसरीकडे सर्वसामान्य मात्र राजकारणावर टीका करत आहेत. दरम्यान, अजित पवार यांच्या निमित्ताने राज्यात नवं राजकीय समीकरण जुळलेलं असताना दुसरीकडे पुन्हा एकदा ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याचं आवाहन केलं जात आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवसेना भवनासमोर पोस्टर लावत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येण्यासाठी आवाहन करण्यात आलं आहे. आता तरी एकत्र या अशी आर्त हाक या पोस्टरमधून देण्यात आली आहे. महाराष्ट्रातील राजकीय भूकंपानंतर मनसे कार्यकर्त्याने शिवसेना भवन परिसरात हे बॅनर लावले आहेत. 


मनसैनिक लक्ष्मण पाटील यांनी हे बॅनर लावले असून, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी एकत्र यावे अशी साद घालण्यात आली आहे. या बॅनरवर बाळासाहेब ठाकरे यांच्यासह राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा फोटो लावण्यात आला आहे. 


"महाराष्ट्राच्या राजकरणाचा चिखल झाला, राजसाहेब - उद्धवसाहेब आता तरी एकत्र या. संपूर्ण महाराष्ट्र वाट पाहत आहे. एका महाराष्ट्रसैनिकाची हात जोडून कळकळीची विनंती," असं लक्ष्मण पाटील यांनी या बॅनरवर लिहिलं आहे. 



राज ठाकरे यांनी शिवसेना सोडल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापन केली होती. यानंतर अनेकांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र यावेत यासाठी प्रयत्न केले होते. पण राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोघांनीही यांनी वारंवार ठामपणे नकार दिला आहे. पण आता अजित पवारांमुळे पुन्हा एकदा मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) एकत्र यावेत यासाठी आवाहन केलं जात आहे. शिवसेना भवनासमोर तसे पोस्टरच लावण्यात आले आहेत. त्यावर राज ठाकरे किंवा उद्धव ठाकरे काही प्रतिसाद देतात का हे पाहावं लागणार आहे. 


राष्ट्रवादीच्या 9 आमदारांची आमदारकी रद्द करण्याची शिफारस


राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे. पाठिंबा जाहीर केल्यानंतर काही वेळातच अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या इतरही काही नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. शपथ घेणाऱ्या नेत्यांमध्ये राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, धनंजय मुंडे, सुनील तटकरे यांच्यासह इतरही नेत्यांचा समावेश आहे. या आमदारांविरोधात आता राष्ट्रवादी काँग्रेसने कायदेशीर कारवाईचं पाऊल उचललं आहे.


“राष्ट्रवादी काँग्रेसच्या 9 सदस्यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि प्रदेशाध्यक्ष यांना कोणतीही कल्पना न देता पक्षाच्या धोरणाच्या आणि पक्षाच्या हिताच्या विरोधात राजभवनात जाऊन शपथ घेतली आहे. त्यांची ही कृती पूर्णपणे बेकायदेशीर आहे. महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना पूर्णपणे अंधारात ठेवून ही कृती करण्यात आली आहे. ही कृती पूर्णपणे बेकायदेशीर आहे. त्यामुळे स्टेट डेसिप्लिन कमिटीच्या सल्ल्यानुसार आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अपात्रतेची याचिका विधानसभा अध्यक्षांकडे दाखल करण्यात आली आहे,” अशी माहिती त्यांनी दिली