विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद : राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी ऑगस्ट 2015 मध्ये औरंगाबाद, मराठवाड्यासह राज्य खड्डे मुक्त करण्याची घोषणा केली होती. तीन वर्ष झाली तरी सुद्धा राज्य आणि मराठवाडा सोडाच, औरंगाबादही खड्डेमुक्त झालेल नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी औरंगाबादमध्ये 2015 मध्ये खड्डे सुधारणांबाबत घोषणा केली होती. आता 2 वर्षांहून जास्त काळ उलटला तरी मंत्री महोदयांची घोषणा सत्यात काही उतरली नाही. 2 वर्षांपूर्वी खड्ड्यांमुळे औरंगाबाद शहरवासीयांचा उद्रेक झाला होता. त्याची दखल घेत चंद्रकांत पाटील यांनी हे आश्वासन दिलं होतं. मात्र हे आश्वासन सुद्धा आता खड्ड्यात हरवलं आहे. महामार्गासाठी केलेल्या अनेक घोषणांपैकी बीडचा महामार्ग वगळता अजून कुठलंही काम सुरु झालेलं नाही. शहरातल्या रस्त्यांची अवस्था तर विचारायची सोय नाही. 


औरंगाबाद शहरातल्या फक्त रस्त्यांसाठी 6 महिन्यांपूर्वी राज्य सरकारनं तब्बल 100 कोटी रुपये दिले. मात्र महापालिकेच्या ढिसाळ कामामूळे अजून निवीदाही निघालेल्या नाहीत. महापौर मात्र अजूनही फक्त आश्वासनंच देण्यात धन्यता मानत आहेत. 


नेतेमंडळी फक्त आश्वासनं देण्यात मश्गुल आहेत. मात्र खड्डे काही अजूनही दुरुस्त होऊ शकलेले नाहीत. त्यातच आता पुन्हा एकदा 15 डिसेंबरपर्यंत राज्यातले रस्ते खड्डेमुक्त करण्याची घोषणा, चंद्रकांत पाटलांनी केलीय. त्यामुळे आता नव्या घोषणा तरी पूर्ण होणार का, हाच खरा नागरिक विचारत आहेत.