रस्त्यांवरच्या खड्ड्यांमुळे अलिबागच्या पर्यटनाला ग्रहण
मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेलं अलिबाग पर्यटकांसाठी फेव्हरिट डेस्टीनेशन आहे.
प्रफुल्ल पवार, प्रतिनिधी, झी मीडिया, अलिबाग : मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेलं अलिबाग पर्यटकांसाठी फेव्हरिट डेस्टीनेशन आहे. मात्र, अलीकडच्या काळात या पर्यटन व्यवसायाला ग्रहण लागलंय. तालुक्यातील सर्वच रस्त्यांवर पडलेल्या खडडयांमुळे पर्यटक इकडे फिरकेनासे झालेत. त्यामुळे त्यावर आधारीत सर्वच व्यावसायिक मेटाकुटीला आलेत.
निसर्गाची मुक्तहस्ते उधळण झालेलं अलिबाग हे पर्यटकांच्या आवडीचं ठिकाण. शनिवार-रविवारी तर पर्यटकांची याठिकाणी मोठी गर्दी असते. त्यामुळे अलिबागचा पर्यटन व्यवसायही तेजीत असतो. अलिबाग आणि परीसरातील आक्षी, नागाव, चौल, वरसोली, रेवदंडा आणि आवास या भागात जवळपास दीडहजारांहून अधिक घरगुती कॉटेजेस आहेत. मात्र. अलिकडच्या काळात या पर्यटन व्यवसायाला अवकळा आलीय. आणि त्याचं कारण आहे येथील रस्ते.
तालुक्यातील कुठल्याही रस्त्यानं जा तुमचं स्वागत खडडयानेच होणार...खोल खडडयांना पर्यटक वैतागले असून त्यांनी अलिबागकडे पाठ फिरवलीय. दिवाळीपासून अलिबागच्या पर्यटन व्यवसाय हंगामाला सुरूवात होते. मात्र, यंदा दिवाळीचे दोन दिवस सोडले तर त्यानंतर पर्यटक फिरकलेच नाहीत. खडड्यांमुळे आता व्यवसायच अडचणीत आल्यानं बँकांचे हप्ते भरायचे कसे असा प्रश्न व्यावसायिकांना पडलाय.
मांडवा ते अलिबाग, अलीबाग ते रेवदंडा आणि अलिबाग ते वावे अशा तालुक्यातील सर्वच प्रमुख रस्त्यांवर खडडयांचे साम्राज्य पसरलंय. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी मूग गिळून गप्प आहेत.
एकीकडे अलिबागकरांना रो-रो सेवा आणि विरार अलिबाग कॉरीडॉरची स्वप्नं दाखवली जातायत. मात्र, सध्या रस्त्यासारखी प्राथमिक सुविधा न देणारे सरकार अलिबागकरांची स्वप्नपूर्ती करेल का याबाबत साशंकताच आहे.