कल्याण :  राज्यात पावसाने रौद्ररुप धारण केले असून मुंबई आणि उपनगरांनाही पावसाने झोडपून काढलं आहे. कल्याण आणि बदलापूर शहराला पाण्याने वेढा घातला आहे. कल्याणमध्ये ठिकठिकाणी पाणी साचलं आहे. याचा परिणाम वीज पुरवठ्यावरही झाला आहे. निर्माण झालेली पुरजन्य परिस्थिती पाहता महावितरणतर्फे 17 हजार 800 ग्राहकांचा वीज पुरवठा बंद ठेवण्यात आल्याची माहिती महावितरणतर्फे देण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महावितरणच्या कल्याण परिमंडळ 1 अंतर्गत बारावे इथून निघणाऱ्या मुरबाड रोड, शहाड, योगीधाम, घोलप नगर परिसरातील 80 ट्रान्सफॉर्मर बंद करण्यात आले आहेत. तर तेजश्री येथून निघणाऱ्या पौर्णिमा फिडरवरील पौर्णिमा सर्कल भागातील 9 ट्रान्सफॉर्मर बंद ठेवण्यात आले आहे. मोहने फिडरवरील 20 ट्रान्सफॉर्मर बंद ठेवण्यात आल्याचं महावितरणतर्फे सांगण्यात आलं आहे. 


या सर्व परिसरात साचलेल्या पाण्याची पातळी कमी होईल त्यानुसार या बाधित क्षेत्राचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.


बदलापूरमध्ये पूरपरिस्थिती


बदलापुरलाही जोरदार पावसाचा तडाखा बसलाय. आठवडाभर सुरू असलेल्या पावसानं उल्हासनदीला पूर आलाय. या पुराचं पाणी बदलापुरातल्या अनेक सोसायट्यांमध्ये शिरलंय. अनेक सोसायट्यांमधल्या गाड्या या पाण्याखाली गेल्यात. काही ठिकाणी गाड्यां 2 फुटांपुर्यंत पाण्यात आहेत. 
बदलापूर शहर आणि एरंजाड गावाला जोडणारा संपूर्ण परिसर जलमय झाला आहे. कर्जत लोणावळा परिसरात पडणाऱ्या संततधार पावसामुळे बदलापूर शहराजवळून वाहणाऱ्या उल्हास नदीला पूर आला आहे. पुराचा बदलापूर पश्चिम भागाला मोठा फटका बसलाय. रमेशवाडी, समर्थनगर, हेंद्रेपाडा, बॅरेजरोड, बाजारपेठ, गणेशनगर, अंजलिनगर परिसर जलमय झाला आहे. अनेक सोसायट्यांच्या पहिल्या मजल्यापर्यंत पाणी गेलं आहे. 


अफवांवर विश्वास ठेवू नका 


कालपासून मुसळधार कोसळणाऱ्या पावसाने ठाणे जिल्ह्याची तहान भागावणाऱ्या एमआयडीसीच्या बारवी धरण क्षेत्रातही दमदार पाऊस होत असून बारवी धरण 62.50 टक्के भरलं आहे. विशेष म्हणजे दोन दिवसा पूर्वी बारवी धरणात 50 टक्के साठा झाला होता. मात्र काल धरण क्षेत्रात 256 मिलीमीटर पाऊस झाल्याने एका दिवसात पाणी साठ्यात 10 टक्के अधिक वाढ झाली आहे. दरम्यान,'बारवी धरणाचे पाणी सोडल्याने पुर परिस्थिती निर्माण झाल्याचा' चुकीचा मेसेज सध्या फिरत आहे. तो मेसेज चुकीचा आहे, अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन एमआयडीसीच्या वतीने करण्यात आलं आहे.