मुंबईतील मुख्य भागात वसलीये खोकला देवी, खोकला बरा होण्यासाठी देवीला दिले जाते पीठ-मीठ
Khokla Devi In Mumbai: मुंबईत अशी अनेक देवस्थाने आहेत ज्याबाबत लोकांना फार कमी माहिती आहे. आज आपण अशाच एका देवीबाबत जाणून घेणार आहोत.
Khokla Devi In Mumbai: मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. सात बेटांची ही मुंबापुरी दिवसरात्र धावत असते. आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी हजारो लोक या मायानगरीत येतात. मुंबईचे स्वरुप हळहळू बदलत आहे. मात्र, अजूनही काही भागात मुंबई तिच्या खुणा जपून आहे. मुंबईचे कितीही रुप पालटले तरी मुंबईतील देवस्थान अद्यापही त्याचे मुळ रुप धरुन आहेत. मुळात मुंबईचे नावच मुंबापुरीदेवीच्या नावावरुन पडले. आजही मुंबईतील काही परिसराची नावे त्या देवस्थानावरुन ओळखली जातात. त्यातीलच एक म्हणजे प्रभादेवी. आज आपण आणखी एका देवीबद्दल जाणून घेणार आहोत. खोकलादेवी असं या देवीचे नाव आहे. जाणून घेऊया देवीबद्दल,
मुंबईत अनेक देवी-देवतांची मंदिरे आहेत. यातीलच एक म्हणजे मुंबईतील प्रभादेवी परिसरात असलेले प्रभावती मंदिर. प्रभावती देवी असं या देवीचे मुळ नाव असून अपभ्रंश होऊन प्रभादेवी असं झाले. पौष पौर्णिमेला या देवीचा मोठा उत्सव भरतो. या जत्रेच्या निमित्ताने अनेक माहेरवाशिणी देवीची ओटी भरण्यासाठी येतात व नवस करण्यासाठी येतात. प्रभादेवीच्या प्रभावतीच्या मंदिराला 300 पेक्षा जास्त वर्ष पूर्ण झाली आहेत.
प्रभादेवीच्या मूर्तीचा इतिहास
प्रभादेवीच्या मंदिरात असलेली शाकंबरीची मूर्ती 12 व्या शतकातील असल्याचे सांगण्यात येते. प्रभादेवी ही मुळची शाकंबरी देवी असल्याचे सांगण्यात येते. पंधराव्या शतकाच्या अखेरीत जेव्हा पोर्तुगीज भारतात आले तेव्हा त्यांनी मुंबईतील अनेक भागांवर आपले अधिपत्य स्थापित केले. पोर्तुगीजांनी स्थानिकांचे धर्मांतर करण्यास सुरुवात केली. मंदिरे लुटून त्यांचा विध्वंसही केला. त्यावेळी या मंदिरातील मूर्ती वांद्रे येथील एका विहिरीत लपवण्यात आली.
पाठारे प्रभू समाजाच्या श्याम नायक यांना देवीने स्वप्नात दृष्टांत दिला मला विहिरीतून काढून माझी मंदिरात प्रतिष्ठापना कर. त्याप्रमाणे नायक यांनी इ.स. १७१४ मध्ये देवीची स्थापना करून १७१५ मध्ये मंदिरांचे बांधकाम पूर्ण केले. पाठारे-प्रभूंची देवी म्हणून तिचे नामकरण प्रभावती असे करण्यात आले, प्रभावती देवीच्या मूर्तीबरोबरच शितलादेवी, मारुती, शंकर, पार्वती, गणपती, खोकला देवी यांच्या मूर्तीसुद्धा मंदिरात आहेत.
खोकला देवी
मंदिरात असलेल्या खोकला देवीबाबतही एक अख्यायिका सांगितली जाते. या देवीची पीठ-मीठाने ओटी भरल्यास खोकला बरा होतो, असं भक्त सांगतात. देवीची ओटी भरल्यास जुन्यातील जुना खोकला बरा होतो. खोकला देवीची पीठ, मिठाने ओटी भरल्यास खोकला बरा होतो असा भक्तांचा अनुभव आहे. या देवीची कोणतीही पूजा-अर्चा केली जात नाही. तसेच या देवीला नवससुद्धा केले जात नाही. देवीची ओटी भरल्याने जुन्यातील जुना खोकला बरा होतो अशी भाविकांची श्रद्धा आहे. कितीही जुन्यातला जुना खोकला असो खूप औषधोपचार करुनही खोकला बरा होत नसेल तर देवीची मीठ-पीठाने ओटी भरल्यास खोकला बरा, होतो असं भक्तगण सांगतात. अनेक नवीन आलेल्या भाविकांना या देवीबद्दल ऐकून आश्चर्य व्यक्त करतात. मात्र भाविक त्यांना याबाबत अनुभव सांगतात.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)