NCP Crisis: राष्ट्रवादीत बंड पुकारुन सत्तेत सहभागी झालेले अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज पुन्हा एकदा शरद पवारांची (Sharad Pawar) भेट घेतली. अजित पवार यांच्यासह प्रफुल्ल पटेलही भेटीसाठी दाखल झाले होते. जवळपास एक तास त्यांनी शरद पवारांशी चर्चा केली. प्रफुल्ल पटेल यांनी भेटीनंतर आजही आशीर्वाद घेण्यासाठी आलो होतो अशी माहिती दिली. तसंच पुन्हा एकदा पक्ष एकसंघ राहावा यासाठी योग्य विचार करा अशी विनंती केल्याचं सांगितलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शरद पवारांची भेट घेतल्यानंतर प्रफुल्ल पटेल यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी काल भेट घेतली तेव्हा फक्त मंत्री उपस्थित होते, पण आज सर्व आमदारांसह आशीर्वाद घ्यायला आलो होतो अशी माहिती दिली. तसंच शरद पवारांनी आपलं म्हणणं ऐकून घेतल्याचं सांगितलं. 


प्रफुल्ल पटेल म्हणाले की, "काल फक्त मंत्री भेटीसाठी आले होते. अजित पवार आणि विधीमंडळाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शरद पवारांचे आशीर्वाद घेण्यासाठी, भेटण्यासाठी आलो होतो. काल रविवार असल्याने आमदार आपापल्या मतदारसंघात होते. आज विधीमंडळाचं अधिवेशन सुरु झाल्याने बऱ्यापेकी आमदार हजर होते. त्यामुळे सर्व आमदार शरद पवारांचा आशीर्वाद घेण्यासाठी दाखल झालो होतो".



पुढे त्यांनी सांगितलं की, सर्वांनी आशीर्वाद घेतला आणि आज पुन्हा एकदा पक्ष एकसंघ राहावा यासाठी विचार करा अशी विनंती केली. शरद पवारांनी म्हणणं ऐकून घेतलं आहे. पण त्यांच्या मनात काय आहे याची मला माहिती नाही.


रविवारीही घेतली भेट


"आमचं सर्वांचं दैवत, नेते आदरणीय शरद पवारांचा आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही आलो होतो. आम्ही वेळ मागितली नव्हती. आम्ही सर्व अजित पवारांच्या घरी होतो, त्यावेळी आम्हाला शरद पवार बैठकीसाठी वाय बी चव्हाण सेंटरला आल्याची माहिती मिळाली होती. म्हणून संधी साधून आम्ही आलो होतो," अशी माहिती प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवार भेटीनंतर दिली होती.


पुढे त्यांनी सांगितलं होतं की, "शरद पवारांच्या पाया पडत आम्ही आशीर्वाद मागितले. आम्हा सगळ्यांच्या मनात त्यांच्यासाठी आदर आहेच. पण राष्ट्रवादी एकसंघ कसा राहील याच्यासाठीही त्यांनी योग्य विचार करावा आणि मार्गदर्शन करावं अशी विनंती केली. शरद पवारांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. त्यांन आमची मंत. विचार, विनंती ऐकून घेतली".