प्रकाश आंबेडकर यांचा काँग्रेसला ३० जानेवारीचा अल्टिमेटम
भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसला ३० जानेवारीचा अल्टिमेटम दिला आहे.
सातारा : भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसला ३० जानेवारीचा अल्टिमेटम दिला आहे. लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाबाबत आम्ही काँग्रेसला ३० जानेवारीपर्यंतची मुदत दिली असल्याचं प्रकाश आंबेडकर साताऱ्यात म्हणाले.
लोकसभा निवडणुकीसाठी प्रकाश आंबेडकर यांनी याआधीच काँग्रेस पक्षाकडे राज्यातल्या ४८ पैकी १२ जागा मागितल्या आहेत. काँग्रेसकडून सकारात्मक प्रतिसाद येईल, अशी अपेक्षा प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली आहे. तसंच काँग्रेसला एमआयएमला सोबत घेण्याबाबत आक्षेप होता, असं आंबेडकर यांनी सांगितलं.
नांदेडमध्ये झालेल्या सभेमध्ये ओवेसी यांनी आपण काँग्रेससोबत प्रचार करणार नाही, तसंच व्यासपिठावरही येणार नाही. काँग्रेसनं प्रकाश आंबेडकर यांना हव्या तेवढ्या जागा द्याव्या, असं वक्तव्य केलं होतं.
ओवेसींनी ही भूमिका घेतल्यानंतर आता काँग्रेसला ३० जानेवारीपर्यंतची मुदत आहे. नाहीतर आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या माध्यामातून निवडणूक लढवू, असं प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केलं.
१२ लोकसभेच्या जागांपैकी माळी, मुस्लिम, धनगर, ओबीसीमधल्या छोट्या जाती, विमुक्त जाती आणि एनटी उमेदवारांना प्रत्येकी २ जागा देण्यात याव्यात, अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. तसंच वंचित बहुजन आघाडी राष्ट्रवादी काँग्रेसला मात्र पाठिंबा देणार नसल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केलं.
फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये शिवाजी पार्क मैदानात वंचित बहुजन आघाडीची सभा घेण्याचा विचार आहे. या सभेमध्ये एमआयएम नेते असदुद्दीन ओवेसीही सहभागी होतील, असं प्रकाश आंबेडकर यांनी पीटीआयशी बोलताना सांगितलं.