यवतमाळ :  यवतमाळच्या मिशन टी-१ या मोहिमेबाबत समाजसेवक प्रकाश बाबा आमटे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केलीय. वाघिणीच्या क्षेत्रावर अतिक्रमण झाल्याने ती आक्रमक झाल्याचे मत आमटे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे व्यक्त केलंय. ऐन वन्यजीव सप्ताहात एखादी वाघीण जीवानिशी मारणे गैर असल्याचंही त्यांनी नमूद केलंय. पत्रकाच्या सुरुवातीला त्यांनी वाघीण हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबियांप्रती आपल्या सहवेदना व्यक्त केल्यात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 आधुनिक उपकरणांच्या सहाय्याने वाघीण शोधणे सहज शक्य असल्याचं त्यांनी म्हटलंय. शोध-बेशुद्धीकरण आणि वाघिणीला अन्यत्र हलविण्याचे उपाय करण्याचे आवाहन त्यांनी केलंय.


वाघिणीचा ठावठिकाणा नाही 


यवतमाळच्या राळेगाव जंगलात सुरू असलेल्या नरभक्षक वाघिणीच्या शोधपथकात नेमबाज नवाब शाफत अली खान पुन्हा सक्रिय झालेत. मिशन टी वन सुरू होऊन २६ दिवस लोटले तरी अद्याप नरभक्षक वाघीण आणि तिच्या दोन बछड्यांचा ठावठिकाणा वनविभागाला लागलेला नाही. त्यामुळे शाफत अली खान यांना पाचारण करण्याचा निर्णय वनविभागाने घेतलाय.


पकडण्याचे आदेश 


नवाब आपल्या पथकासह राळेगावच्या जंगलात दाखल झालेत. सर्वोच्च न्यायालयाने १३ जणांचे बळी घेणाऱ्या टी वन या वाघिणीला जेरबंद अथवा ठार मारण्याचे आणि तिच्या 2 बछड्यांना बेशुद्ध करून पकडण्याचे आदेश कायम ठेवल्यानंतर वनविभागाने युद्धपातळीवर हाती घेतलेल्या मिशनमध्ये हैद्राबाद येथील शूटर नवाबला नियुक्त केले होते. मात्र वाढत्या विरोधानंतर नवाबला या मिशनमधून बाजूला करण्यात आलं होतं.