मेघा कुचिक / मुंबई : काँग्रेसच्या (Congress) नेत्या आमदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांनी भाजपवर (BJP) जोरदार हल्लाबोल चढवला आहे. भाजपने उंटावर बसून शेळ्या हाकणं बंद करावं, ग्रासरूट लेव्हलला स्थिती खूप वेगळी आहे, लोकं आता भाजपविरोधात बोलायला लागले आहेत, हे त्यांनी लक्षात घ्यावे, असा जोरदार टोला प्रणिती यांनी हाणला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनाही त्यांनी चिमटा काढला आहे. तुम्ही काही परत येत नाही, त्यामुळे त्यांनी आता सत्ता परिवर्तनाबाबत गप्प बसणे योग्य आहे, असे त्या म्हणाल्या.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता आम्ही सत्तेत आहोत. त्यामुळे पक्षवाढीबरोबरच चांगले काम करण्याची चांगली संधी आहे. कोणाला काय द्यावं हा पक्षश्रेष्ठींचा निर्णय असतो, संधी आहे काम करणं महत्वाच आहे. त्याकडे आता लक्ष दिले पाहिजे. एकादा मोठा निर्णय घेण्याबाबत पक्ष श्रेष्ठी निर्णय घेतील, त्यावर बोलण योग्य ठरणार नाही, असे उपमुख्यमंत्री पदाबाबत विचारलेल्या प्रश्नावर आमदार प्रणिती शिंदे म्हणाल्या.


100 टक्के पक्ष संघटनेला ताकद देणं, महाविकास आघाडीची ध्येयधोरणे तळागाळातील लोकांपर्यंत पोहचवावीत यासाठी प्रयत्न करणार आहोत. दलित, अल्पसंख्याक, महिला यांना ताकद देणं यासाठी आमची टीम काम करेल, असे त्या म्हणाल्या. शेतकरी आंदोलनाकडे भाजप दुर्लक्ष करत आहे, शेतकऱ्यांवर अन्याय केला जात आहे, अशी टीका त्यांनी भाजपवर केली.


प्रत्येक राज्यात काँग्रेस पक्ष शेतकऱ्यांबाबत आंदोलन करत आहेत, शेतकरी आंदोलन किती पेटलं आहे. ते सर्वसामान्यांपर्यंत पोहोचत आहे. केवळ काँग्रेसच नाही तर इतर पक्षही याबाबत आंदोलन करत आहेत. फडणवीस नेहमीच वेगवेगळे दावे करत असतात की पुन्हा येईल वैगरे. मात्र, ते नेहमी खोटे ठरले आहेत. भाजपने उंटावर बसून शेळ्या हाकणं बंद करावं, ग्रासरूट लेव्हलला स्थिती खूप वेगळी आहे, लोकं आता त्यांच्या विरोधात बोलायला लागले आहेत.