Maharashtra Politics : छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) जन्म हा कोकणात झाला असे विधान भाजपचे विधान परिषदेचे आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी केल्यानंतर त्यांच्यावर चौफेर टीका होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात (Kokan) झाला आहे. रायगडावर त्यांचे बालपण गेले आणि रागडवारच त्यांनी स्वराज्यांची शपथ घेतली, असे विधान प्रसाद लाड यांनी केले आहे. यावर स्वतः प्रसाद लाड यांनी व्हिडीओ जारी करत दिलगिरी व्यक्त केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मी चूकही सुधारली होती - प्रसाद लाड


"छत्रपती शिवरायांच्या नावाने राष्ट्रवादी जे राजकारण करत आहे, त्याचा मी निषेध व्यक्त करतो. काल ज्या भावनेतून मी वक्तव्य केलं, तिथे मी चूकही सुधारली होती. छत्रपती शिवाजी महाराजांची कर्मभूमी व स्वराज्याची स्थापना ही कोकणातून झाली असे मी स्पष्ट केलं होतं. छत्रपतींचा जन्म शिवनेरीवर झाला, हे सुद्धा त्यावेळीच सांगितलं. माध्यमात ते आलेले आहे. तरीही छत्रपतींचे नाव घेऊन राजकारण करण्याचं काम राष्ट्रवादी सातत्याने करत आहे. राष्ट्रवादीचा मी निषेध व्यक्त करतो. माझ्या वक्तव्यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो," असे प्रसाद लाड यांनी जारी केलेल्या व्हिडीओमध्ये म्हटले आहे.


काय म्हणाले प्रसाद लाड?


"स्वराज्य भूमी कोकण महोत्सव कशासाठी असे तुम्ही विचाराल. हिंदवी स्वराज्याची स्थापना शिवाजी महाराजांनी केली आहे. संपूर्ण देशाचे आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला आहे. रायगडावर त्यांचे बालपण गेले आणि रागडवारच त्यांनी स्वराज्यांची शपथ घेतली. त्यामुळे ती सुरुवात कोकणातून झाली," असे प्रसाद लाड म्हणाले. यावेळी पत्रकार परिषदेत प्रसाद लाड हे जवळ ठेवलेल्या चिठ्ठीमधून काहीतरी वाचत होते असेही दिसून आहे.


प्रसाद लाड महाराष्ट्राचा नवीन इतिहास लिहीणार का? - संजय राऊत


प्रसाद लाड यांचे विधान समोर आल्यानंतर खासदार संजय राऊत यांनीही प्रतिक्रिया दिली. "प्रसाद लाड हे इतिहासकार आहेत का? भाजपचं डोकं फिरलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची भवानी तलवार यांच्या पक्षाचे मुंडके छाटणार आहे. रोज कुणीतरी उठतो आणि शिवाजी महाराजांविषयी बोलतो. मला असं वाटायला लागलंय की रोज यांच्या स्वप्नात अफजलखान आणि औरंगजेब येतो आणि यांच्या कानात मंत्र देतो आणि हे बोलायला लागतात. शिवाजी महारांवर बोलण्याची यांची लायकी आहे का? शिवाजी महाराजांविषयी अख्ख्या जगाला माहिती आहे. भाजपने नव्या इतिहास संशोधन मंडळाची स्थापना केली आहे का? प्रसाद लाड आता महाराष्ट्राचा नवीन इतिहास लिहीणार का?," असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.