किरण ताजणे, नाशिक :   नाशिक शहरात शुक्रवारी झालेल्या पावसाने गोदाकाठी पाणीच पाणी झाले. गोदाकाठी उभी असलेली वाहनं पाण्यात गेली आणि पाणी वाढल्याने वाहनं बाहेर काढण्यासाठी नागरिकांना बरेच प्रयत्न करावे लागले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

निसर्ग चक्रीवादळानंतर नाशिकमध्ये पाऊस झाला होता. त्यानंतर आठ दिवसांनी मान्सूनपूर्व सरींनी नाशिकला झोडपले. मोठ्या पावसात गोदावरी नदीला पूर येतो. यावेळी मान्सूनपूर्व सरींनी गोदाकाठी पाणी झाले आणि नागरिकांचीही तारांबळ उडाली.



विशेषतः गोदाकाठी असलेली वाहने पाण्यात गेल्याने नागरिकांना वाहनं बाहेर काढण्यासाठी धडपड करावी लागली. त्यामुळे मान्सून दाखल होईल तेव्हा नाशिकमध्ये काय स्थिती असेल याची झलक आज पाहायला मिळाली.


राज्याच्या विविध भागात पावसाने हजेरी लावली. कोकण, दक्षिण महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रात बारामती, मराठवाड्यातील बीड, विदर्भात चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा या भागापर्यंत मान्सून पोहचला आहे. वर्ध्यात आज मान्सून चांगला बरसला.



कोकणात रायगडमध्ये मान्सूनपूर्व सरी कोसळल्या. माणगाव, पाली परिसरात जोरदार सरी कोसळल्या आणि उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा दिला.


राज्याच्या उर्वरित भागात मान्सून ४८ तासांत दाखल होणार असल्याची माहिती वेधशाळेने दिली आहे. त्यामुळे नाशिकसह उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्याचा उर्वरित भाग आणि संपूर्ण विदर्भात दोन दिवसांत मान्सून दाखल होईल.