यवतमाळ : यवतमाळच्या आर्णी तालुक्यातील आयता गावात गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन घरातील मायलेकींचा होरपळून मृत्यू झाला आहे. आयता गावातील विनोद जयस्वाल यांच्या घराच्या छपराला सकाळी आठ वाजताच्या सुमारास आग लागली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 जयस्वाल यांच्या घरात असलेल्या किरकोळ विक्रीसाठीच्या पेट्रोल साठ्यामुळे ही आग भडकली असल्याची माहिती मिळाली आहे. या आगीत घरातील गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट झाला. घरात असलेल्या आईसह पाच वर्षीय मुलीचा होरपळून मृत्यू झाला. काजल विनोद जैस्वाल (वय ३०) असे आईचे तर वैभवलक्ष्मी (वय ५) असे मृत मुलीचे नाव आहे. मृत काजल ह्या गर्भवती होत्या. त्यामुळे तीन जीव या आगीने घेतले. हा स्फोट झाला त्यावेळी दोघी मायलेकीच घरी होत्या. 



 
 मृत काजलचे पती विनोद जयस्वाल धामणगाव देव येथील मुंगसाजी महाराजांच्या पुण्यतिथी सोहळ्यासाठी पदयात्रेवर गेले होते. दरम्यान, घरी असलेली त्यांची गर्भवती पत्नी व चिमुकली मुलगी सिलेंडर स्फोटात ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली. 
 
 अचानक लागलेल्या आगीने क्षणात भडका घेतला आणि जयस्वाल कुटुंबातील मायलेकीचा जागीच कोळसा झाला. सोबतच अख्ख्या घराची राखरांगोळी झाली. 
 या आगीबाबत माहिती मिळताच अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. 
 
 दुसरीकडे ग्रामस्थांनी जमेल तसे पाणी फेकून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र या आगीतून दोघी मायलेकींना वाचवता आले नाही. या दुर्दैवी भीषण घटनेने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.