पुणे : महापालिका रुग्णालयात डॉक्टर उपलब्ध नसल्यानं गर्भवती महिलेला दुस-या रुग्णालयात हलवावं लागलं. मात्र यामध्ये त्या महिलेचा मृत्यू झाल्याचा प्रकार पुण्यात घडलाय. या प्रकरणी कामावर गैरहजर असलेल्या डॉक्टरवर कारवाईची मागणी स्थानिक नगरसेवकांनी केलीय. शुभांगी जानकर असं मृत्यू झालेल्या महिलेचं नाव आहे. ती ८ महिन्यांची गरोदर होती. गुरुवारी रात्री तिची प्रकृती अचानक बिघडली. त्यामुळे तिला येरवड्यातल्या राजीव गांधी रुग्णालयात आठच्या सुमाराला नेण्यात आलं. 


कोणीच डॉक्टर उपलब्ध नव्हते


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र त्यावेळी रुग्णालयात कोणीच डॉक्टर उपलब्ध नव्हते. म्हणून शुभांगी जानकर हिला ससून रुग्णालयात हलवण्यात आलं. मात्र त्या दरम्यान तिचा मृत्यू झाला. प्रत्यक्षात रुग्णालयात रात्रपाळीवर असलेले डॉकटर विजय बडे सायंकाळी ५ ते दुसऱ्या दिवशी सकाळी ९ अशी ड्युटी असूनही त्यावेळी रुग्णालयात नव्हते. 


घटनेवेळचं सीसीटीव्ही फुटेज डिलीट


धक्कादायक बाब म्हणजे रुग्णालयात उशिरा येऊनही डॉक्टर विजय बडे यांनी आपण रुग्णालयातच हजर होतो, असं दाखवण्याचा खटाटोप चालवला आहे. यासाठी त्यांनी रुग्णालयातील त्या घटनेवेळचं सीसीटीव्ही फुटेज डिलीट केल्याचा आरोप होतोय. याप्रकरणी महापालिका आरोग्य विभागानं विजय बडेला कारणं दाखवा नोटीस बजावली आहे.