मान्सूनपूर्व पावसाचा बळी, वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू
बोरोळ येथील शेतकरी बाजीराव नागप्पा मेहत्रे असे या मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
शशिकांत पाटील, झी मीडिया, लातूर : लातूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. देवणी तालुक्यातील बोरोळ परिसरात वादळी वारे, पावसासह एका शेतकऱ्याचा अंगावर वीज पडून मृत्यू झाला आहे. बोरोळ येथील शेतकरी बाजीराव नागप्पा मेहत्रे असे या मृत शेतकऱ्याचे नाव आहे. त्यामुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.
काल राज्यातील अनेक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या. दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या राज्यात काही ठिकाणी या पावसामुळे दिलासा मिळाला. तर काही ठिकाणी दुर्देवी घटना घडल्या. अचानक आलेल्या पावसाने सऱ्यांची धावपळ झाली. पेरणीच्या तयारीसाठी शेतातील कामे करत असताना अचानक वादळी वारे आणि पाऊस सुरू झाला. देवणीतील बोरोळ येथे दुर्देवी प्रकार घडला. पावसापासून बचावासाठी बाजीराव म्हेत्रे हे एका झाडाखाली थांबले होते. त्याच वेळी त्यांच्या अंगावर वीज पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. सदर घटनेची माहिती होताच महसूल विभाग आणि पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.
यावेळी मयत बाजीराव म्हेत्रे यांच्या कुटुंबीयांनी मोठा टाहो फोडला. पंचनाम्यानंतर सदर प्रेत शवविच्छादन करण्यासाठी देवणीच्या शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले होते. मयत मेहत्रे यांच्या पश्चात तीन मुले आणि पत्नी असा परिवार असून त्यांच्या अचानक जाण्याने कुटुंबियांसहित बोरोळ गावावर शोककळा पसरली आहे.