नाणार रिफायनरी प्रकल्पाला मदत करण्यास कोकण रेल्वे सज्ज
नाणार प्रकल्पाला मदत करायला कोकण रेल्वे सज्ज झाली आहे.
रत्नागिरी : जिल्ह्यातल्या राजापूर तालुक्यातील नाणार येथील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पामुळे राजकीय वातावरण तापलं आहे. स्थानिक या प्रकल्पाविरोधात आक्रमक आहेत. मात्र या प्रकल्पाला मदत करायला कोकण रेल्वे सज्ज झाली आहे. कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता यांनीच तसे संकेत दिले आहेत.
नाणार रिफायनरी प्रकल्प करताना सागरी मार्ग महत्वाचा ठरणार आहे. त्याचबरोबर कोकण रेल्वेची भूमिकाही महत्वाची ठरणार आहे. यासंदर्भात रत्नागिरी रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल्स लिमिटेड म्हणजेच आर आर पी सी एल कंपनीशी प्राथमिक स्तरावर चर्चा सुरु झाली. मात्र रिफायनरी प्रकल्प नक्की कुठे होईल यानंतरच पुढली दिशा ठरणार असल्याचं कोकण रेल्वेचे संचालक संजय गुप्ता यांनी रत्नागिरीत आयोजित पत्रकार परिषदेत सांगितलं.
पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी कोकण रेल्वेच्या सुरु असणाऱ्या विविध प्रकल्पांसंदर्भात माहिती दिली. रिफायनरी प्रकल्पावरून सध्या राजकीय वातावरण तापलं आहे. स्थानिक या प्रकल्पाच्या विरोधात आक्रमक झाले आहेत. त्यात सरकारकडून हा प्रकल्प रेटण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. हा प्रकल्प करताना सागरी मार्ग महत्वाचा ठरणार आहे.