नागपूर : अनंत चतुर्दशीनिमित्त आज होणाऱ्या विसर्जनासाठी राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरमध्ये जयत्त तयारी आहे. नागपूर महानगरपालिकेने विसर्जनाकरता १९८ कृत्रिम तलाव बांधले आहेत. या तलावांचा शोध घेणे सोपे जावे याकरता `moryaa' नावाचे अॅप देखील तयार केला आहे. तर दुसरीकडे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि पोलिसांमधील DJ च्या वापरावरून वाद सुरूच असून विसर्जनाच्या मिरवणुकीत देखील DJ च्या वापरावर निर्बंध असतील हे पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.


सुरक्षेच्या दृष्टीने चार हजार पोलीस कर्मचारी आणि अधिकारी तैनात करण्यात येणार आहेत. बाप्पाच्या विसर्जनाची तयारी सर्वत्र सुरु झाली असताना, नागपूर महानगर पालिकेनं `विसर्जन तुमच्या दारी' संकल्पना राबवत बाप्पाच्या भक्तांसाठी विसर्जन अधिकच सोपं केलं आहे. नागपूर महापालिकेनं विसर्जनाकरता मोबाईल व्हॅनची व्यवस्था केली आहे. ही व्यवस्था करणारे नागपूर हे राज्यातील एकमेव शहर असून अशा प्रकारे विसर्जनाची सोय नागपूरकरांच्या दारी आली आहे. पालिकेच्या अधिकाऱ्यांना ठराविक मोबाईल क्रमांकावर कॉल केले तर ही व्हॅन घरी हजर होते.