New Governor Of Rajasthan: राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांनी देशातील 10 राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांमधील राज्यपालांची नियुक्ती केली आहे. यामध्ये महाराष्ट्राचाही समावेश असून आज विद्यमान राज्यपाल रमेश बैस यांचा कार्यकाळ संपुष्टात येत असतानाच सी. पी. राधाकृष्णन यांची राज्याच्या राज्यपालपदी नियुक्ती झाली आहे. महाराष्ट्रासाठी आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे भाजपाचे राज्यातील ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडेंची राजस्थानच्या राज्यपाल पदी नियुक्ती झाली आहे. राजस्थानचे विद्यमान राज्यपाल कलराज मिश्र यांची जागा हरिभाऊ बागडे घेतील. मिश्र यांचा पाच वर्षांचा राज्यपाल पदाचा कार्यकाल पूर्ण झाल्याने त्यांच्या जागी बागडेंची नियुक्ती करण्यात आली आहे.


कशी आहे राज्यस्थानच्या नव्या राज्यपालांची कारकिर्द?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हरिभाऊ किसन बागडे यांचा जन्म 17 ऑगस्ट 1944 साली झाला आहे. ते महाराष्ट्राच्या विधानसभेचे 14 वे अध्यक्ष आहेत. 2014 ला झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये बागडे यांनी फुलंब्री मतदारसंघामधून विजय मिळवला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघामधून आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या बागडे यांनी 1985 साली पहिल्यांदा आमदारकीची निवडणूक लढवली होती. आपल्या पहिल्याच निवडणुकीमध्ये त्यांनी दणदणीत विजय मिळवलेला. त्यानंतर ते सलग चार वेळा आमदार म्हणून निवडून आले. 1995 ते 1999 दरम्यान बागडे हे मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री होते. 11 नोव्हेंबर 2014 रोजी 13 व्या महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी बागडेंची बिनविरोध निवड झाली होती.


खास महाराष्ट्रीयन लूक


हरिभाऊ बागडे हे त्यांच्या पारंपारिक महाराष्ट्रीयन पद्धतीच्या पोशाखासाठी ओळखले जाता. डोक्यावर गांधी टोपी, जॅकेट आणि पुढारी मंडळी घालतात तसे पांढरे कपडे अशाच पोशाखात हरिभाऊ बागडे पाहायला मिळतात. त्यामुळे आता राजस्थानच्या राज्यपाल भवनामध्येही बागडे यांचा हाच लूक पाहायला मिळणार असून ते आपल्या पोशाखामधून महाराष्ट्राशी असलेले कनेक्शन कायम ठेवतील. 


नक्की वाचा >> 'तामिळनाडूचे मोदी' महाराष्ट्राचे नवे राज्यपाल... संयुक्त राष्ट्र, RSS कनेक्शन; सी. पी. राधाकृष्णन यांच्याबद्दलच्या 15 रंजक गोष्टी जाणून घ्या...


महाराष्ट्राचा पाच वर्षात तिसरे राज्यपाल


दुसरीकडे महाराष्ट्रामध्ये सी. पी. राधाकृष्णन हे मागील पाच वर्षातील महाराष्ट्राचे तिसरे राज्यपाल असतील. 2019 साली भगतसिंह कोश्यारी यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी 5 सप्टेंबर 2017 ते 17 फेब्रुवारी 2023 दरम्यान राज्यपालपद भूषवलं. त्यानंतर रमेश बैस यांनी 18 फेब्रुवारी 2023 ते 28 जुलै 2024 दरम्यान महाराष्ट्राचं राज्यपालपदाची जबाबदारी पार पाडली. आता राज्याला सी. पी. राधाकृष्णन यांच्या माध्यमातून 24 वे राज्यपाल मिळाले आहेत.


नवे राज्यपाल खालीलप्रमाणे :


सी. पी. राधाकृष्णन् - महाराष्ट्र
हरिभाऊ किसनराव बागडे - राजस्थान
संतोषकुमार गंगवार - झारखंड
रमण डेका - छत्तीसगड
सी. एच. विजयशंकर - मेघालय
ओमप्रकाश माथूर - सिक्किम
गुलाबचंद कटारिया - पंजाब, चंदीगड
लक्ष्मण प्रसाद आचार्य - आसाम, मणिपूर (अतिरिक्त कार्यभार)
जिष्णू देव वर्मा - तेलंगणा
के. कैलाशनाथन - पुद्दुचेरी (उपराज्यपाल)