राळेगणसिद्धी : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे. मात्र अजूनही राज्य तसेच केंद्र सरकारने मागण्यांबाबत कुठलीही ठोस पावलं उचललेली नाहीत. त्यामुळे आपल्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर जनता पंतप्रधान नरेंद्र मोदींना जबाबदार धरेल असं विधान अण्णा हजारे यांनी केलं आहे.  त्यातच अण्णांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं पत्र मिळालं आहे. मात्र या पत्रात अण्णांच्या मागणीबाबत कुठलाही उल्लेख करण्यात आलेला नाही. एक जानेवारीचं पत्र मिळाले, असा एका ओळीचा उल्लेख या पत्रात करण्यात आला आहे. अण्णांनी सरकारला ३५ पत्रे पाठवलीत. मात्र ५ वर्षात सरकारकडून आलेलं हे दुसरं पत्र आहे. त्यामुळे अण्णांनी खंत देखील व्यक्त केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुसरीकडे अण्णांच्या उपोषणामुळे राळेगणसिद्धीमध्ये ग्रामस्थ आक्रमक झालेत. अण्णांच्या समर्थनार्थ राळेगणवासियांनी रास्तारोको आंदोलन केलं. राळेगण चौकात पारनेर वाडेगव्हाण रस्त्यावर ग्रामस्थांनी रास्ता रोको केलं. महिला पुरुषांसह विद्यार्थी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झाले. यावेळी पोलिसांनी १०० ते १५० कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. यावेळी जेलभरो करण्याचा निर्धार राळेगणवासियांनी केला आहे. राळेगणवासिय चांगलेच आक्रमक झाले असून आता कुठल्याही परिस्थितीत माघार घेणार नसल्याचं ग्रामस्थांनी सांगितलं आहे. लोकपाल नियुक्ती करण्यासाठी अण्णा हजारे ३० जानेवारीपासून उपोषणाला बसले आहेत. 


महाराष्ट्राचे मंत्रीमंडळ लोकायुक्ताच्या अधिकार क्षेत्रात आणण्याचा निर्णय नुकताच झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (२९ जानेवारी) झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्र्यांव्यतिरिक्त मंत्री, विरोधी नेते देखील लोकायुक्तच्या अधिकार क्षेत्रात येणार आहेत. लोकायुक्तांच्या कायद्यात माजी मुख्यमंत्री आहेत पण यामध्ये विद्यमान मुख्यमंत्री देखील असावेत अशी अण्णांची मुख्य मागणी आहे. कायदा करा किंवा अध्यादेश काढा अशी अण्णांची मुख्य मागणी आहे. 


अण्णा हजारे यांनी लोकपालच्या अंमलबजावणीवरून फडणवीस सरकारवर यापूर्वीही ताशेरे ओढले होते. लोकपाल कायदा झाल्यानंतर १ वर्षांच्या आत राज्यात लोकायुक्त कायदा होणे गरजेचे असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काहीही कार्यवाही केली नाही. राज्याला देवेंद्र फडणवीस हे चांगले मुख्यमंत्री मिळाले, असे कौतुक आपण करीत होतो. पण साडेचार वर्षानंतर मुख्यमंत्र्यांची अवस्था 'ढवळ्या शेजारी बांधला पवळ्या, वाण नाही पण गुण लागला', अशी झाल्याची टीका अण्णा हजारे यांनी केली होती. 


तसेच अण्णा हजारे यांनी केंद्रातील मोदी सरकारलाही धारेवर धरले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही सरकारने लोकपाल कायदा लागू केला नाही. आज हा कायदा अस्तित्त्वात असता तर राफेल घोटाळा झाला नसता. लोकपाल कायद्याच्या अंमलबाजवणीत चालढकल करून सरकारने जनतेची दिशाभूल केली, असे अण्णा हजारेंनी म्हटले होते.