मतमोजणी केंद्राच्या बाहेर अपक्ष उमेदवाराचे चक्क खासगी बॉडीगार्डस
२४ तास खासगी सुरक्षा व्यवस्था
योगेश खरे, नाशिक : नाशिकमध्ये मतमोजणी केंद्रावर अपक्ष उमेदवार माणिकराव कोकाटे यांनी आपली २४ तास खासगी सुरक्षा व्यवस्था नेमली आहे. सरकारी सुरक्षेवर विश्वास नसल्याचा दावा करत ही सुरक्षा व्यवस्था नेमण्यात आली आहे. यासाठी निवडणूक अधिकाऱ्यांकडे परवानगी घेण्यात आली आहे. महाराष्ट्रात अशी खासगी सुरक्षा नेमण्याचा प्रकार नाशिकमध्ये प्रथमच करण्यात आला आहे.
मतदारराजानं उमेदवारांचं भविष्य ईव्हीएममध्ये बंद केलं आहे. पण आता तिथे काही घातपात नको, याची धाकधुक एवढी वाढली आहे की नाशिकमधले अपक्ष उमेदवार माणिकराव कोकाटे यांनी मतदान केंद्राबाहेर चक्क खासगी सुरक्षारक्षक नेमले आहेत. तशी परवानगीही त्यांना निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली आहे. महाराष्ट्रात अशी खाजगी सुरक्षा नेमण्याचा विक्रम पहिल्यांदाच झाला आहे.