Gadchiroli News : विदर्भात पावसाचा कहर पहायला मिळत आहे.  गडचिरोली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे तीन दिवसांपासून भामरागडचा संपर्क तुटला आहे. सर्व मार्ग बंद झाले आहेत. अशातच एका महिलेला रक्ताची गरज होती. प्रशासनाने तत्परता दाखवत  हेलिकॉप्टरने महिलेसाठी रक्त पोहचवले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गडचिरोली जिल्ह्यात अतिवृष्टी झाली आहे. यामुळे तीन दिवसांपासून भामरागडचा संपर्क तुटला आहे. याच दरम्यान पुरातून वाट काढत आलेल्या एका महिलेची प्रसूती वैद्यकीय अधिकार्‍यांनी केली होती. त्या मातेला एक पिशवी रक्त चढविल्यानंतर आणखी एक पिशवी रक्ताची गरज भासली. पुरामुळे सगळ्या वाटा अडलेल्या होत्या. अशा परिस्थितीत पावसाने विश्रांती घेतल्यानंतर सकाळी हेलिकॉप्टरने रक्ताची पिशवी पोहोचवण्यात आली. 


मंतोशी गजेंद्र चौधरी असे  महिलेचे नाव आहे. मंतोशीचा रक्तगट B-ve आहे. पुराने रक्ताची पिशवी भामरागड ग्रामीण रुग्णालयात पोहोचविणे कठीण झाले होते. एकीकडे पूर व दुसरीकडे वाईट हवामान यामुळे हेलिकॉप्टरने रक्तपिशवी पोहाेचविण्यास अडचण येत होती. 


अखेर आकाश निरभ्र होताच गडचिरोलीतून एक पिशवी रक्त घेऊन आरोग्य कर्मचारी भामरागडला रवाना झाले. यासाठी पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी जिल्हा पोलीस दलाचे हेलिकॉप्टर विनाविलंब उपलब्ध करुन दिले. पूरसंकटात आरोग्य विभागाची तत्परता व खाकी वर्दीने दाखविलेल्या माणुसकीची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे.