अरूण मेहेत्रे, झी 24 तास पुणे : गटारी म्हंटली की मांसहारप्रेमींना हायसं वाटतं. चिकन आणि मटणाच्या दुकानांवर लोकांच्या रांगा लागल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. पण पुण्यात गटारीपूर्वीच एका चिकन विक्रेत्यावर संक्रांत आली आहे. कारण एका चोरट्यानं चिकन विक्रेत्याच्या कोंबड्यांवरच डल्ला मारला आहे.


पुण्यातल्या चिकन विक्रेत्यांमध्ये कोंबडी चोरांची दहशत


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


आषाढ महिच्या शेवटी शेवटी सर्वांना वेध लागतात ते गटारीचे. श्रावण महिना सुरू होण्यापूर्वी मांसाहारी मंडळी चिकन, मटण, मच्छीवर चांगलाच ताव मारतात आणि आपलं मनं भरुन मांसाहार करतात. याकाळात कोंबडी, बकरे सगळ्यांची मागणी असते त्यामुळे हे मांसाहार विक्रेत्यांचे हे दिवस कमावण्याचे दिवस असतात. परंतु पुण्यात गटारी सरू होण्यापूर्वीत एक विचित्र प्रकार घडला आहे.


पुण्यातील एका कोंबडीचोरानं हडपसर हिंगणेमळा इथल्या हाजी चिकन शॉपमधल्या कोंबड्यांवरच डल्ला मारला आहे. परंतु या दुकानातल्या CCTV फुटेजमध्ये या कोंबड्या चोराला पाहिले गेले आहे. याने चिकन विक्रेत्याच्या कोंबड्यांच्या पिंज-याचं कुलूप तोडून त्यानं जवळपास 20 गावरान कोंबड्या लंपास केल्या आहेत.


गटारी तोंडावर आली असताना हे संकट ओढावल्याने चिकन विक्रेत्याला डोक्यावर हात मारून घेण्याची वेळ आली आहे. गटारीपूर्वी हा चोरटा सापडला नाही, तर मुद्देमालच हातचा जाण्याची भीती चिकन विक्रेत्यांमध्ये आहे. कारण गल्ल्यापेक्षा कोंबडीवरच्या डल्ल्यातच त्यांना जास्त रस आहे.