`ऑडी`वाल्या कलेक्टरीण! खासगी कारवर अंबर रंगाचा दिवा लावून मिरवणं पूजा खेडकर यांना भोवलं
Pooja Khedkar : IAS अधिकारी पूजा खेडकर यांना भोवलंय. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात प्रोबेशनरी अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या पूजा खेडकर यांची बदली करण्यात आलीये. आता पोलिसांनाही त्यांना दणका दिलाय.
Pooja Khedkar : वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर यांना 21 हजार रुपये दंड ठोठावण्यात आलाय. ऑडी कारवर वाहतूक नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आलीये. पूजा खेडकर यांनी त्यांच्या खासगी कारवर अंबर दिवा लावला होता. त्याचबरोबर महाराष्ट्र शासन अशी पाटीली लावली होती. याप्रकरणी पोलीस चौकशी करण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचले. मोटर वाहन नियम कायद्यांतर्गत ही कारवाई करण्यात येत असल्याचं पोलिसांनी सांगितलंय. पोलीस खेडकरांच्या बंगल्याजवळ पोहोचल्यानंतर त्यांना कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही...त्याचबरोबर पोलिसांनी आवाज देऊनही कुणी गेट उघडलं नाही.
पूजाच्या आई माध्यमांवर आल्या धावून
पोलीस कारवाई करण्यासाठी पूजा खेडकर यांच्या घरी पोहोचले तेव्हा प्रशिक्षणार्थी आयएएस पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर या माध्यमांच्या कॅमेऱ्यांवर धावून आल्या. मनोरमा खेडकर यांच्या हातात असलेल्या क्लचरने त्यांनी कॅमेऱ्याच्या लेन्सवर मारण्याचा प्रयत्न केला. मनोरमा खेडकर माध्यमांच्या कॅमेऱ्यांना चित्रीकरणास विरोध करत होत्या.
'ऑडी'वाल्या कलेक्टरीण
पुण्यात पूजा खेडकर यांची जोरदार चर्चा आहे. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात त्या प्रोबेशनरी अधिकारी म्हणून रूज झाल्या. मात्र अवघ्या काही दिवसांतच ऑडीवाल्या कलेक्टरीण म्हणून त्या ओळखल्या जाऊ लागल्या. कारण ऑडीसारखी महागडी खासगी गाडी त्या सरकारी कामासाठी वापरत होत्या. या ऑडीवर महाराष्ट्र शासन असं स्पष्टपणं लिहिलेलं होतं. पुण्यात रूजू होण्यापूर्वीच त्यांनी कार, निवासस्थान आणि शिपाई अशा सोयीसुविधांची मागणी केली. इतकंच नाही तर वॉशरूम अटॅच नसल्यानं त्यांना देण्यात आलेला स्वतंत्र कक्ष त्यांनी नाकारला. परवानगी न घेता खेडकरांनी वरिष्ठ अधिकाऱ्याच्या अँटी चेंबरचा ताबा घेतला. स्वतःच्या खासगी ऑडी कारवर अंबर रंगाचा दिवा लावला. खासगी ऑडी कारवर महाराष्ट्र शासन असे स्टिकर लावले. केवळ पूजा खेडकरच नाही, तर त्यांचे वडील दिलीप खेडकर यांच्या वर्तनाबद्दलही आक्षेप घेतले जातायत.
कोण आहेत पूजा खेडकर
डॉ. पूजा खेडकर 2023 बॅचच्या IAS अधिकारी आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डीचे माजी सनदी अधिकारी दिलीप खेडकर यांच्या त्या कन्या. वडील दिलीप खेडकर प्रदूषण विभागाचे आयुक्त होते. आजोबा जगन्नाथराव बुधवंत हे देखील आयएएस अधिकारी होते. वडील खेडकर यांनी अलिकडेच वंचितच्या पाठिंब्यावर अहमदनगर दक्षिणमधून लोकसभा निवडणूक लढवली. तर आई डॉ. मनोरमा खेडकर या भालगावच्या लोकनियुक्त सरपंच आहेत
पूजा खेडकर यांचे कथित कारनामे उघड झाल्यानंतर आता त्यांची वाशिमला बदली करण्यात आलीय. अजून प्रोबेशन काळ संपला नाही तर या महिला आयएएस अधिकाऱ्याला व्हीव्हीआयपी कल्चरची सवय लागलीय. उद्या अख्खं प्रशासन ताब्यात येईल तेव्हा कलेक्टरीण मॅडमचा तोरा काय असेल, याची कल्पनाच केलेली बरी.