Ajit Pawar | अजित पवार यांच्या मोबाईल नंबरचा खंडणी मागण्यासाठी गैरवापर
उपमुख्यमंत्री अजितपवार यांच्या मोबाईल नंबरचा गैरवापर करुन बड्या बांधकाम व्यवसायिकाला धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे.
पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar ) यांच्या मोबाईल नंबरचा गैरवापर करुन बड्या बांधकाम व्यवसायिकाला धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. इतकच नाही, तर 20 लाखांची मागणीही या बिल्डरकडून करण्यात आली आहे. या प्रकरणी पुणे पोलिसांनी 6 जणांना अटक करुन गुन्हा दाखल केला आहे. (pune bandgardan poilce arrested 6 people who demanded 20 lakh rupees from builder deputy chief minister ajit pawar name via fake call app)
सध्या सोशल मीडियावर फेक अॅपचा सुळसुळाट आहे. एका अॅपच्या मदतीने तुम्हाला हवं त्या व्यक्तीच्या क्रमांकाने कॉल करता येतो. या अॅपच्या मदतीने या टोळक्यांनी बांधकाम व्यवसायिकाला फोन केला. कहर म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा स्वीय सहाय्यक (पीए) चौबे बोलतोय सांगत खंडणीची मागणी केली. व्यवसायिकाने 20 पैकी 2 लाख रुपयेही दिले.
खंडणीच्या कॉलनंतर बांधकाम व्यवसायिकाने बंडगार्डन पोलिसांना कल्पना दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तसेच हा प्रकार गेल्या 10 दिवसांपासून 13 जानेवारीपर्यंत सुरु असल्याची माहिती बांधकाम व्यवसायिकांनी पोलिसांनी दिली.
बांधकाम व्यवसायिकाने दिलेल्या फिर्यादीनंतर पोलिसांनी सूत्र फिरवली. पोलिसांनी 6 जणांना अटक केली. त्यामुळे तुम्हाला असा कोणाच्या नावाने कॉल आला किंवा आला असेल, तर घाबरुन न जाता स्थानिक पोलिसांना याची माहिती द्या.