Pune Bopdev Ghat Rape Case: `तिन्ही आरोपींचे Encounter करा, फडणवीसांनी कमरेला...`
Pune Bopdev Ghat Rape Case: बोपदेव घाटामध्ये मित्राबरोबर गेलेल्या तरुणीचं अपहरण करुन तीन तरुण तिला कारमधून घेऊन गेल्याची माहिती पोलीस तपासामध्ये समोर आली आहे.
Pune Bopdev Ghat Rape Case: पुण्यातील बोपदेव घाटामध्ये तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेनं पुणे शहर पुन्हा एकदा हादरले आहे. ही तरुणी बोपदेव घाटात मित्रासोबत फिरायला गेली होती. त्यावेळी या तरुणीवर तीन जणांनी बलात्कार केल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणी कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. असं असतानाच आता उद्धव ठाकरे गटाचे प्रवक्ते तसेच खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणात तर तरुणीवर बलात्कार झाल्याचं नमूद करत सदर प्रकरण बदलापूर प्रकरणापेक्षा गंभीर असल्याने गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी या प्रकरणातील आरोपींचं एन्काऊन्टर करावं अशी मागणी केली आहे.
बोपदेव घाटात घडलं काय?
पीडित तरुणी तिच्या मित्रासोबत फिरायला पुण्याजवळील बोपदेव घाटात गेली होती. तेव्हा त्या ठिकाणी या दोघांजवळ तीन तरुण आले. सुरुवातीला त्यांनी आपण मानवधिकार संघटनेचे कार्यकर्ते असल्याची बतावणी केली. नंतर या तिघांनी या तरुणीचे अपहरण केले. या तिघांनी तरुणीवर आळीपाळीने लैंगिक अत्याचार केला.
आधी फोटो काढले मग...
तरुणीला आणि तिच्या मित्राच्या मनात दहशत निर्माण करण्यासाठी आपण खरोखरच मानवाधिकार संघटनेचे कार्यकर्ते असल्याचं पटवून देण्यासाठी आधी तिन्ही आरोपींनी बोपदेव घाटात या तरुणी आणि तिच्या मित्राचे फोटो काढले. त्यानंतर त्यांनी या तरुणीला कारमधे बसवून कार येवलेवाडी भागातील एका गल्लीत नेली. तिथे कारमध्ये या तरुणीवर तिघांनी आळीपाळीने लैंगिक अत्याचार केले, अशी माहिती समोर येत आहे. पुणे पोलिसांनी या प्रकरणामध्ये आरोपींच्या शोधासाठी 10 पथके रवाना केली आहेत.
राऊतांचा राज्य सरकारवर निशाणा
पुण्यातील बलात्कार प्रकरणावरुन संजय राऊत यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. "(पुणे बलात्कार प्रकरणातील) तिघांचे एन्काऊन्टर पोलिसांनी करावे. जे फडणवीस आणि मुख्यमंत्री शिंदेंनी बदलापूरात केलं तेच तिकडे (पुण्यात) करावे," असं राऊत यांनी म्हटलं आहे. "एका अल्पवयीन मुलीवर तिघेजण बलात्कार करतात हे प्रकरण बदलापूरपेक्षा भयानक घटना आहे," असंही राऊत म्हणाले. "फडणवीसांनी आपल्या कमरेला जे पिस्तूल लावले आहे ते काढावे आणि फोटोमधून बाहेर यावं. फटा पोस्टर आणि निकला क्या खलनायक असं नाही चालणार. सरकारने एन्काऊन्टर करावं, पोस्टरमधून त्यांनी बाहेर यावं;" असा टोला राऊत यांनी लगावला.