पुणे सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींचे स्केच जाहीर, तुम्ही यांना पाहिलंत का?
Pune Bopdev Ghat Rape Case: पुण्यातील बोपदेव घाटामध्ये तरुणीवर सामूहिक बलात्कार करणाऱ्या संशयित आरोपींचे स्केच जाहीर करण्यात आले आहे.
Pune Bopdev Ghat Rape Case: पुण्यातील बोपदेव घाटामध्ये तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. याप्रकरणाचे पडसाद राज्यभरात उमटत आहे. विरोधी पक्षांकडून मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यावर टीका केली जात आहे. या तिघांचे एन्काऊन्टर पोलिसांनी करावे. जे फडणवीस आणि मुख्यमंत्री शिंदेंनी बदलापूरात केलं तेच तिकडे करावे अशी टीका राऊतांनी केलीय. दरम्यान या घटनेतील आरोपींचे स्केच समोर आले आहे. यामुळे आरोपींपर्यंत पोहोचण्यास पोलिसांना मदत होणार आहे.
पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी बोपदेव घाट अत्याचार घटनास्थळाची पाहणी केली. याप्रकरणी 3 आरोपींवर गुन्हा दाखल केला असून अत्याचार करणाऱ्या तिघांचे रेखाचित्र काढण्यात आल्याची माहिती देण्यात आली. या आरोपींच्या शोधासाठी पुणे पोलिसांनी तब्बल 10 पथक रवाना केली आहेत. अनेक सीसीटीव्ही, संशयित गाड्यांची तपासणी युद्ध पातळीवर सुरू असल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे.
काय आहे घटना?
बोपदेव घाटात मित्रासोबत फिरायला गेलेल्या तरुणीवर तीन जणांनी बलात्कार केल्याची घटना घडली.तेव्हा त्या ठिकाणी या दोघांजवळ तीन तरुण आले. सुरुवातीला त्यांनी आपण मानवधिकार संघटनेचे कार्यकर्ते असल्याची बतावणी केली. नंतर या तिघांनी या तरुणीचे अपहरण केले. या तिघांनी तरुणीवर आळीपाळीने लैंगिक अत्याचार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
राऊतांची सरकारवर टीका
उद्धव ठाकरे गटाचे प्रवक्ते तसेच खासदार संजय राऊत यांनी याप्रकरणावरु सरकारवर टीका केली आहे. हे प्रकरण बदलापूर प्रकरणापेक्षा गंभीर असल्याने गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी या प्रकरणातील आरोपींचं एन्काऊन्टर करावं अशी मागणी त्यांनी केली आहे. फडणवीसांनी आपल्या कमरेला जे पिस्तूल लावले आहे ते काढावे आणि फोटोमधून बाहेर यावं. फटा पोस्टर आणि निकला क्या खलनायक असं नाही चालणार. सरकारने एन्काऊन्टर करावं, पोस्टरमधून त्यांनी बाहेर यावं;" असा टोला राऊत यांनी लगावला.