पुण्यातील बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांच्या अडचणीत वाढ
ईडीचे पथक सकाळी 8.30 वाजता पुण्यातील ABIL या कार्यालयात दाखल झाले. या पथकानं त्यांच्या कार्यालयाची चौकशी देखील केली
मुंबई: पुण्यातील उद्योजक अविनाश भोसले यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून ED च्या फेऱ्यात चौकशीला सामेरे जात आहे. ईडीचा ससेमिरा मागे लागला असताना आता पुण्यातील बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांच्या कार्यालयावर ED ने छापा टाकला आहे.
ईडीचे पथक सकाळी 8.30 वाजता पुण्यातील ABIL या कार्यालयात दाखल झाले. या पथकानं त्यांच्या कार्यालयाची चौकशी देखील केली. केंद्रीय सुरक्षा दलाच्या गार्डचा पहारा सध्या या कार्यालयात आहे. विदेशी चलन प्रकारात चौकशी सुरू असताना ईडीचं पथक थेट पुण्यात तळ ठोकून बसल्याने भोसले यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
अविनाश भोसले यांचा रिक्षा चालक ते व्यावसायिक प्रवास फार वेगानं आणि थक्क करणारा होता. मात्र या प्रवासात 2007 मध्ये अडथळा आला आणि अनेक संकट उभी राहिली. सुरुवातीलारोजगार शोधण्यासाठी नगरहून अविनाश भोसले पुण्याला आले. त्यावेळी त्यांनी रिक्षा चालवण्याचं काम सुरू केलं. हळूहळू ते रिक्षा भाड्यानं देऊ लागले आणि ओळख वाढवून त्यांनी ठेकेदारीच्या व्यवसायात प्रवेश केला.
रस्त्याची लहान-मोठी कंत्राट घेऊन त्यांनी आपला व्यवसाय वाढवला. झटपट वेगानं त्यांनी प्रगती करण्यास सुरुवात केली. 2007 मध्ये मुंबई विमानतळावर पहिल्यांदा अविनश भोसले यांना अडवण्यात आलं. त्यांनी कस्टम ड्युटी न भरता अनेक वस्तू विमानतळाबाहेर नेत असल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला होता.
2017 म्हणजे 10 वर्षांनंतर इन्कमटॅक्स विभागानं त्यांच्या घरावर छापा टाकला. त्यावेळी अविनाश भोसले पुन्हा एकदा चर्चेत आले. त्यानंतर त्यांच्यामागे EDचा ससेमिरा सुरू झाला. त्यांच्यावर चौकशी
याआधी प्रताप सरनाईकांच्या मागेही EDची घरघर
शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावर EDनं छापेमारी केली आहे. प्रताप सरनाईक यांच्या राजकीय कारकीर्दीला राष्ट्रवादीतून सुरुवात झाली होती. मात्र 2008 मध्ये त्यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला. त्याआधी प्रताप सरनाईक देखील सुरुवातीला रिक्षा चालवायचे. त्यांच्या रिक्षाचालक ते कोट्य़वधींचा मालक होण्यापर्यंतचा प्रवास थक्क करणारा होता.
प्रताप सरनाईक यांच्या मुलाची ईडीकडून चौकशी करण्यात आली आहे. प्रताप सरनाईक यांच्यानंतर आता प्रसिद्ध व्यावसायिक अविनाश भोसले यांच्यामागे ईडीचा ससेमिरा लावण्यात आला आहे. यासगळ्यात महत्त्वाचा दुवा म्हणजे दोन्ही नेते हे सुरुवातीला रिक्षा चालक म्हणून काम करायचे. आता दोन्ही रिक्षा चालक ईडीच्या रडारवर आहेत.