चैत्राली राजापूरकर, झी मीडिया, पुणे : गुरुवारी राज्यभरात लाडक्या गणरायाला गणेश भक्तांनी निरोप दिला आहे. काही ठिकाणी गणेशोत्सवाला (Ganeshotsav 2023) गालबोट लागलं आहे. मात्र पुण्यात (Pune Crime) चार दिवसांपूर्वी डीजे लावू नका असा सांगणाऱ्या एका व्यक्तीला तब्बल 21 जणांनी मारहाण केल्याचा प्रकार मावळमध्ये समोर आला आहे. मुलाचे निधन झालं आहे त्यामुळे घरासमोर डीजे (DJ) लावू नका अशी विनंती मारहाण झालेल्या व्यक्तीने केली होती. मात्र 21 जणांनी मनात राग धरुन त्या व्यक्तीला बेदम मारहाण केली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करुन आरोपींना अटक केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मावळमध्ये गणपती मिरवणुकीदरम्यान डीजे लावू नका, मुलाचे निधन झाले आहे असं म्हटल्यामुळे रागाच्या भरात 21 जणांच्या टोळक्याने एका कुटुंबाला बेदम मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी तळेगाव पोलीस ठाण्यात 21 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली आहे. या घटनेची सध्या परिसरात चर्चा सुरु आहे.


25 सप्टेंबर रोजी सोमाटणे फाटा या ठिकाणी सुनील प्रभाकर शिंदे यांच्या घरासमोरून गणपती मिरवणूक जात होती. तिथे डीजे लावला जात असल्याचे बघून शिंदे यांनी माझ्या मुलाचे काही दिवसांपूर्वी निधन झाले आहे. आम्ही दुःखात आहोत, इथे डीजे लावू नका अशी विनंती केली. सुनील शिंदे यांच्या मुलाचे निधन झाल्याने संपूर्ण कुटुंब दुःखात होतं. त्यामुळेच त्यांनी घरासमोरून मिरवणूक घेऊन  जाणाऱ्या लोकांना डीजे वाजवू नका असे सांगितले होते. त्यावेळी मिरणवणुकीतल्या कार्यकर्त्यांनी डीजे बंद केला आणि मिरवणूक पुढे नेली. मात्र डीजे बंद करायला लावल्याचा राग कार्यकर्त्यांच्या मनात होता.


गणपती विसर्जन करुन आल्यानंतर 21 जणांच्या टोळक्याने शिंदे यांच्या कुटुंबावर हल्ला केला. सुनील शिंदे यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील लोकांना या आरोपींनी काठ्या आणि लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत शिंदे जबर जखमी झाले. त्यांनी तळेगाव पोलीस ठाणे गाठून आपली फिर्याद नोंदवली. पोलिसांनी तात्काळ गुन्हा नोंदवत 21 आरोपींना अटक केली आहे.


पोलिसांनी काय सांगितले?


"सात दिवसांच्या गणपतीचे विसर्जन असताना शिंदे वस्ती येथून सार्वजनीक गणपतीची मिरवणूक चालली होती. सुनील शिंदे यांच्या नातवाईकाचे निधन झाल्याने त्यांनी मंडळाला विनंती केली की इथे डीजे वाजवू नका. पुढे गेल्यावर डीजे सुरु करा. त्यावेळी बाचबाची झाल्यानंतर त्यांनी डीजे वाजवणं बंद केले. त्यानंतर रात्री अकरा वाजता विसर्जन केल्यानंतर वाद्य वाजवू न दिल्याचा राग मनात ठेवून कार्यकर्त्यांनी जीवे मारण्याच्या उद्देषाने तक्रारदाराला मारहाण केली," अशी माहिती तळेगाव दाभाडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सत्यवान माने यांनी दिली.