ट्रिपल सीट जाताना रोखलं म्हणून लष्कराच्या जवानाने ट्रॅफिक हवालदाराच्या डोक्यात घातला सिमेंट ब्लॉक
Pune Crime : पुण्यात वाहतुकीचे नियम तोडणाऱ्या एका जवानाला दंड केल्यामुळे वाहतूक हवालदारावर हल्ला करण्यात आला आहे. पुणे पोलिसांनी याप्रकरणी जवानाला अटक केली आहे.
Pune Crime : पुण्यात (Pune News) वाहतुकीच्या नियमांचे सर्रासपणे उल्लंघन केले जात असल्याचे अनेकदा पाहण्यात आलं आहे. मात्र याला आळा घालण्यासाठी पुणे वाहतूक पोलिसांकडून (Pune Traffic) सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. पण एका वाहतूक पोलिसाला नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करणे चांगलेच महागात पडलं आहे. बाईकवर ट्रिपल सीट जाणाऱ्यांना अडवल्याने एका पोलीस कर्मचाऱ्यावर (Pune Police) जीवघेणा हल्ला करण्यात आल्याचा प्रकार पुण्यात घडला आहे.
या हल्ल्यात पुणे शहर पोलिसातील एका 33 वर्षीय ट्रॅफिक हवालदाराच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. या ट्रॅफिक हवालदारावर सध्या अतिदक्षता विभागात (ICU) उपचार सुरु आहेत. बुधवारी संध्याकाळी एका लष्करी जवानाने सिमेंट ब्लॉकने या हवालदारावर हल्ला केल्याची माहिती पुणे पोलिसांनी दिली. पोलीस हवालदार रोमेश धावरे (33) यांनी 4 सप्टेंबर रोजी लष्करी जवान वैभव संभाजी मनगटे (25) याला महिन्याभरापूर्वी बाईकवरून ट्रिपल सीट प्रवास केल्याबद्दल चालान कापले होते. त्यानंतर दोघांमध्ये वाद झाला होता. जवानाच्या मनात हवालदार रोमेश धावरे याच्या विरोधात राग होता. त्याच रागातून वैभव मनगटेने रोमेश यांच्यावर सिमेंट ब्लॉकने हल्ला केला.
पोलिसांनी याप्रकरणी मनगटेवर खुनाचा प्रयत्न आणि सरकारी कर्मचाऱ्यावर हल्ला केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. बुधवारी संध्याकाळी सातच्या सुमारास पुण्यातील बुधवार चौकात घडलेल्या घटनेनंतर त्याला अटक करण्यात आली. धावरे हे पुणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या फरासखाना वाहतूक विभागात कार्यरत आहेत. मनगटे सध्या जोधपूर येथे तैनात आहे. तो सप्टेंबरपासून पुण्यात वैद्यकीय उपचारांसाठी आलेल्या एका लष्करी जवानासोबत कर्तव्यावर आहे. वैभव संभाजी मनगटे हा मूळचा ल छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील मंगरूळ गावचा रहिवासी आहे.
"4 सप्टेंबर रोजी धावरे यांनी मनगटे याला बाईकवरून ट्रिपल सीट प्रवास केल्याबद्दल चालान बजावले होते. त्यावेळी दोघांमध्ये वाद झाला. बुधवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास धावरे हे बुधवार चौकात कर्तव्यावर असताना पाठीमागून आलेल्या मनगटे त्यांच्या डोक्यात सिमेंटच्या ब्लॉकने वार केले. या घटनेनंतर मनगटे याला अटक करण्यास आली. तर धावरे यांना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात हलवण्यात आले. धावरे यांची प्रकृती सध्या चिंताजनक पण स्थिर आहे," अशी माहिती फरासखाना पोलिसांनी दिली. दरम्यान, मनगटे विरोधात भारतीय दंड संहिता कलम 307 (हत्येचा प्रयत्न), 333 आणि 353 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.