Pune Crime : ललित पाटीलचं पुढे काय झालं? 2000 किलो एमडी ड्रग्ज सापडल्यावर जितेंद्र आव्हाडांचा खडा सवाल!
Pune MD Drugs Case : पुणे पोलिसांच्या कारवाईनंतर आता या प्रकरणाचे पडसाद राजकीय वर्तुळात उमटताना दिसत आहेत. अशातच आता आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी पुणे पोलिसांवर सडकून टीका केली आहे.
Jitendra Awhad On Pune Drugs Case : पुण्यात गेल्या तीन ते चार दिवसांत चार हजार कोटींचं ड्रग्ज जप्त (Pune Drugs News) करण्यात आलंय. दोन हजार किलो एमडी ड्रग्ज पुणे पोलिसांनी (Pune Police) जप्त केलं. पुणे ड्रग्ज प्रकरणातील सांगली कनेक्शन समोर आलंय. दिल्ली आणि पुण्यातल्या ड्रग्ज कारवाईनंतर सांगलीत ड्रग्ज प्रकरणी चौकशी करण्यात येत आहे. सांगलीतील कुपवाडमध्ये मोठ्या प्रमाणात ड्रंग्ज साठा आल्याचं पुणे पोलिसांच्या तपासात समोर आलंय. त्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांचं पथक कुपवाड शहरात ठाण मांडून बसलंय. पुणे पोलिसांच्या पथकाकडून कुपवाडमधल्या स्वामी मळा, बाळकृष्ण नगर आणि दत्तनगर या ठिकाणी चौकशी करण्यात येत आहे. मात्र चौकशीच्या बाबतीत पुणे पोलिसांच्याकडून प्रचंड गुप्तता पाळण्यात येत आहे. पुणे पोलिसांच्या कारवाईनंतर आता या प्रकरणाचे पडसाद राजकीय वर्तुळात उमटताना दिसत आहेत. अशातच आता आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी पुणे पोलिसांवर सडकून टीका केली आहे.
काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?
शिक्षणाचं माहेरघर असलेल्या पुण्याची ओळख बदलून ड्रग्ज राजधानी होतंय का? अशी शंका वाटू लागलेय. दोन दिवसांत तब्बल 4 हजार कोटी रुपयांचं 2000 किलो एमडी ड्रग्ज जप्त होण्याची पुणे पोलिसांच्या इतिहासातील सर्वात मोठी कारवाई म्हणजे खरंतर पुणे पोलिसांनी शरमेनं मान खाली घालण्यासारखी गोष्ट आहे, अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.
पुणे शहराच्या आतमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थांचा साठा पोहोचेपर्यंत पुणे पोलीस विभाग नक्की काय करत होतं? अचानक एवढ्या मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ कसे सापडले? कुणाच्या आशीर्वादाने आजवर हा कारभार सुरू होता? अमली पदार्थांचा पुरवठा नेमका कुणा केला जातोय? पुण्यात महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून मुलंमुली शिकायला येतात, हे विद्यार्थी या ड्रग्जच्या विळख्यात अडकले आहेत का? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत.
दरम्यान, ससून रुग्णालयातून चालविण्यात येणाऱ्या अमली पदार्थ तस्करी रॅकेट प्रकरणी अटक आरोपी ललित पाटील, रोहन चौधरी व शिवाजी शिंदे यांचं पुढे काय झालं? कुणाशी त्यांचे लागेबंधे होते, हे अद्याप प्रकाशझोतात आलेलं नाही. केवळ कारवाईची हेडलाईल मिळवून काहीही साध्य होणार नाही. अमली पदार्थ पुरवठादार, ग्राहक आणि कुणाच्या वरदहस्ताने हे सुरू आहे याचे धागेदोरे शोधून त्यांच्यावर ताबडतोब कारवाई करायला हवी, अशी मागणी जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.