`माझ्यासोबत आली नाहीस तर...` पुण्यात `लिव्ह इन` मध्ये राहणाऱ्या तरुणीसोबत धक्कादायक प्रकार
Pune Crime: पुण्यात लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या जोडप्यांमध्ये वाद झाला. बघता बघता हा वाद खूपच विकोपाला गेला. हा सविस्तर घटनाक्रम जाणून घेऊया.
Pune Crime: मुंबई- पुणे सारख्या शहरांत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या कपल्सची संख्या मोठी आहे. या नात्याच्या समाजातील मान्यत्येविषयी अजून अस्पष्टता असल्याने यातील पीडितांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. पुण्यातून असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या जोडप्यांमध्ये वाद झाला. बघता बघता हा वाद खूपच विकोपाला गेला. हा सविस्तर घटनाक्रम जाणून घेऊया.
पुण्यात राहणाऱ्या तरुणीने आपल्या लिव्ह इन पार्टनरविरोधात पोलिसांमध्ये तक्रार केली. या दोघांमध्ये मागच्या 4 वर्षांपासून प्रेमसंबंध होते. पण मागच्या काही दिवसांपासून त्यांच्यात वाद सुरू होते. दरम्यान 25 ऑगस्ट च्या रात्री हा वाद विकोपाला गेल्याचे पाहायला मिळाले. सय्यद अर्षद अली असे या आरोपीचे नाव असून तो नागपूर येथील भालदार पुरा बडी मशिदीजवळ राहतो. तर फिर्यादी तरुणी ही 23 वर्षांची आहे.
फिर्यादी तरुणी तिच्या कामाच्या ठिकाणी होती. यावेळी आरोपी त्या ठिकाणी गेला आणि फिर्यादीला आपल्यासोबत येण्याची मागणी करु लागला. फिर्यादी तरुणीने यासाठी नकार दिला. पण थोड्यावेळाने आरोपी यासाठी जबरदस्ती करू लागला. दरम्यान तू माझ्यासोबत बाहेर आली नाही तर तुझ्यावर तेल फेकेल अशी धमकी आरोपीने तरुणीला दिली. तरुणीने प्रियकराविरोधात दिलेल्या तक्रारीवरुन सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
HPCL मध्ये बंपर भरती, मुंबईत नोकरी आणि 2 लाखांवर पगार; 'ही' घ्या अर्जाची थेट लिंक
पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील सिंहगड कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये हा प्रकार घडला. हा प्रकार पाहिल्यानंतर कॅन्टीन मधील इतर कर्मचारी आरोपीला थांबवण्यासाठी पुढे सरसावले. पण आरोपी खूपच आक्रमक झाला. आणि त्याने कॅन्टीन कर्मचाऱ्यांच्या अंगावर काचेची बाटली उगारली. तसेच त्यांना शिवीगाळदेखील केली.
फिर्यादी तरुणी आरोपीसोबत बोलून वाद मिटविण्याचा प्रयत्न करत होती. पण इतक्यातच त्याने तिच्या जोरात कानशिलात लगावली. तू माझ्यासोबत आली नाहीस तर मी स्वतःला काहीतरी करुन घेईन आणि तुला फसवेन अशी धमकी द्यायला त्याने सुरुवात केली. दरम्यान सिंहगड रस्ता पोलीस याप्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.
MRVC Job: मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनमध्ये भरती, पदवीधरांनी 'येथे' पाठवा अर्ज
केक घेतला नाही म्हणून घरात घुसला अन्..
पुण्यातील एका दुसऱ्या घटनेत एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या एका तरुणाने तरुणीवर हल्ला केला आहे. तरुणीच्या वाढदिवसानिमित्त आरोपी तरुणाने तिच्या घरी केक पाठवला होता. मात्र तो केक तिने न स्वीकारल्याने आरोपीने तिच्या सोसायटीतील सुरक्षारक्षकांसोबत वाद घातला आणि जबरदस्तीने या तरुणीच्या घरात प्रवेश केला. घरात प्रवेश करून या तरुणाने तरुणीवर हल्ल्याचा देखील प्रयत्न केलाय. कोंढवा पोलीस ठाण्याच्या (Pune Police) हद्दीतील एका उच्चभ्रू सोसायटीत 24 ऑगस्टच्या रात्री हा संपूर्ण प्रकार घडला.
कोंढवा पोलीस ठाण्यात याप्रकरणी अंकित सिंग (वय 31) या तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तीस वर्षीय तरुणीने या प्रकरणी तक्रार दिली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. या सगळ्या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.