Pune Crime News : पुण्यात जिथे दहशतवाद्यांचं ट्रेनिंग सुरु होते त्या शाळेबाबत धक्कादायक अपडेट
Pune Crime News : पुण्यात कोंढवा परिसरात एका इमारतीत PFIकडून सुरू होतं दहशतवादी प्रशिक्षण, एनआयएकडून दोन मजले सील. शाळाच अनधिकृत असल्याचं उघड. शाळेवर गुन्हा दाखल होणार.
Nia On School Pune Crime News : पुण्यातल्या शाळेत दहशतवाद्यांचं ट्रेनिंग सुरु असल्याचे उघड झाल्यानंतर एकच खळबळ उडाली. यानंतर आता या शाळेबाबत धक्कादायक अपडेट समोर आली आहे. पुण्यात ज्या इमारतीत दहशतवाद्यांचं प्रशिक्षण सुरू असल्याचं उघड झाल्यानंतर आता त्या इमारतीतली शाळाही अनधिकृत असल्याचं समोर आले आहे. आता या शाळेवरच गुन्हा दाखल होणार आहे. PFIकडून दहशतवादी प्रशिक्षण देण्यात येत होते अशी माहिती तपासात उघड झाली आहे. एनआयएकडून इमारतीचे दोन मजले सील करण्यात आले आहेत.
शाळेकडे बोगस मान्यता प्रमाणपत्र
कोंढव्यातली ब्लू बेल्स नावाची ही स्वयं अर्थसाहित शाळा आहे. या शाळेवर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पुणे विभागीय शिक्षण उपसंचालकांनी दिलीय. विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाने केलेल्या चौकशीत या शाळेकडे बोगस मान्यता प्रमाणपत्र असल्याचे आढळून आले आहे. शाळा अनधिकृतपणे चालवली जात असल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. तत्कालीन शिक्षण उपसंचालक आहिरे यांच्या स्वाक्षरीचे पत्र या शाळेकडे आहे. परंतु या पत्राचा आवक जावक क्रमांक शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडे उपलब्ध नाही. तसेच या शाळाकडे असणाऱ्या मान्यता पत्रावरील आहिरे यांची स्वाक्षरी बनावट असल्याचे निदर्शनास आले आहे.
ब्ल्यू बेल्स ही स्वयंम अर्थसाहित शाळा असून 2019 मध्ये ही शाळा सुरू झाली. इयत्ता पहिली ते बारावी पर्यंतचे वर्ग शाळेत सुरू आहेत. या शाळेकडे उपलब्ध असणारे पुणे विभागीय शिक्षण उपसंचालकांचे मान्यता प्रमाणपत्र बोगस आहे. पत्रावरील आहिरे यांची स्वाक्षरी बनावट असल्याची खातरजमा केली आहे. आता राज्य शासनाचे मान्यता प्रमाणपत्र खरे आहे की खोटे याबाबतची माहिती तपासावी लागणार आहे. शाळेकडे बोगस मान्यता प्रमाणपत्र असल्याचा अहवाल राज्याचे शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांना सादर करण्यात आला आहे.
गेल्यावर्षी याच ठिकाणी एनआयएने छापे टाकले होते
पुण्यातील कोंढवा परिसरात के. झेड नॉलेज सेंटर या इमारतीच्या चौथ्या आणि पाचव्या मजल्यावर दहशतवादी कारवायांचं प्रशिक्षण दिलं जात होतं अशी धक्कादायक माहिती समोर आलीय. या इमारतीचा चौथा आणि पाचवा मजला एनआयएने सील केलाय. या ठिकाणी गेल्यावर्षी एनआयएने छापे टाकले होते. त्यानंतर देशभरातून पीएफआयच्या कार्यकर्त्यांना अटक करण्य़ात आली. या इमारतीच्या पहिल्या काही मजल्यांवर ब्लू बेल नावाची शाळा चालवली जाते. तर वरचे चौथा आणि पाचवा मजला हा डिग्निटी एज्युकेशन ट्रस्ट नावाच्या संस्थेला भाडेतत्वावर दिले होते. तिथे देशविघातक कारवाया सुरू होत्या अशी माहिती आहे. हे दोन मजले एनआयएने सील केले आहेत. या इमारतीत कारवाई केलेल्या मजल्यांवर शस्त्र आणि हल्ल्याचं प्रशिक्षण दिलं जात होतं अशी माहिती एनआयएने दिली आहे.