Crime News : गेल्या काही महिन्यांपासून विद्येचे माहेरघर, महाराष्ट्राची सांस्कृतिक राज्यधानी अशी ओळख असलेले पुणे (Pune News) शहर वाढत्या गुन्हेगारीमुळे चर्चेत आलं आहे. संघटीत टोळ्यांची दहशत असतानाच आता पुण्यात कोयता गॅंग (Koyata Gang) दरारा निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. दिवसाढवळ्या गुन्हेगारी प्रवृत्तीकडे झुकणारे तरुण हातात कोयते घेऊन पुण्याचा विविध भागात दहशत (Pune Crime) निर्माण करत आहे. यामध्ये अल्पवयीन मुलांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. त्यामुळे आता कोयता गॅंगची दहशत मोडण्यासाठी पुणे पोलिसांनी नवीन युक्ती लढवली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोलिसांसाठी कोयता गॅंग ठरतेय डोकेदुखी


पुणे शहर आसपासच्या परिसरात सुरुवातीपासूनच संघटीत टोळ्यांची नागरिकांत मोठी दहशत आहे. यावर पुणे पोलिसांनी या टोळ्यांमधील अनेक गुन्हेगारांविरोधात मोक्का (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा) कायद्याअंतर्गत कारवाई केली आहे. ही कारवाई सुरु असतानाच पुण्यात कोयता गॅंगने दहशत माजवण्यास सुरुवात केली आहे. अल्पवयीन मुलांचा या गॅंगमध्ये मोठ्या प्रमाणात समावेश असून त्यांच्यामार्फत अनेक ठिकाणी दहशत माजवली जात आहे. गुन्हेगारी टोळ्यांवर कारवाई केल्यानंतर आता कोयता गँग पोलिसांसाठी डोकेदुखी ठरली आहे.


आधार कार्ड सक्तीचे


मात्र आता कोयता गँगवर आळा बसावा तसेच शहरातील गुन्हेगारी कमी व्हावी यासाठी  पुणे पोलिसांनी नवीन योजना आखली आहे.  या पुढे शहरात कुठेही कोयता घ्यायचा असेल तर त्या व्यक्तीला आधारकार्ड द्यावं लागणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी दिली आहे. यासंदर्भात पुणे पोलिसांच्यावतीने शहरातील कोयता विक्रेत्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. प्रत्येक कोयता विक्री खरेदी करणाऱ्याला आता आधार कार्ड द्यावं लागणार आहे.


अठरा कोयते जप्त; दोघांना अटक


 मार्केटयार्ड येथील आंबेडकरनगर परिसरात बेकायदेशीररित्या कोयते बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी दोघांना सापळा रचून अटक केली आहे. त्यांच्याकडून 18 कोयते जप्त करण्यात आले असून मार्केटयार्ड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रिक्षामधून हे कोयते जप्त करण्यात आले आहे.याप्रकरणी पोलिसांनी भवणसिंग भुरसिंग भादा (35), गणेशसिंग हुमनसिंग टाक (32) यांना अटक करण्यात आली आहे. 


गुन्हेगारी रोखण्यासाठी पुणे पोलिसांची बक्षिसांची खैरात


याआधी पुणे शहर आणि परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या कोयता गँगच्या मुसक्या आवळण्यासाठी पुणे पोलिसांनी कंबर कसली होती. या गुंडांचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिसांनी बक्षिसांची खैरात सुरू केली. जो कर्मचारी कोयता गँगच्या आरोपीला पकडून आणेल त्याला बक्षीस (Reward) म्हणून रोख रक्कम देण्याची घोषणा पुणे पोलिसांनी केली आहे. पिस्तूल जवळ बाळगणाऱ्या आरोपीला पकडणाऱ्यांना 10 हजार तसेच फरार आरोपी पकडून दिल्यास त्यालाही 10 हजारांचं बक्षीस देण्यात येईल. मोक्का किंवा एमपीडीएतील आरोपी पकडल्यास 5 हजारांचं बक्षीस जाहीर करण्यात आलंय. तर कोयता बाळगणार्‍याला पकडल्यास तीन हजार रुपये बक्षीस दिले जाणार आहे. 


कोयता येतो कुठून?


पुणे आणि आसपासच्या परिसरात शेतीच्या कामासाठी वापरले जाणारे कोयते अवजारांच्या दुकानांमध्ये, आठवडी बाजारांमध्ये विक्रीसाठी ठेवण्यात येतात. मंगळवार पेठेतील जुन्या बाजारामध्ये या कोयत्यांची खुलेआम विक्री होते. शेतीच्या कामात अवजार म्हणून वापरला जाणारा कोयता गुन्हेगारीसाठी वापरला जात असल्याने चिंतेचे वातावरण आहे. त्यामुळे आता पुणे पोलिसांनी कोयता खरेदीसाठी आधार कार्ड सक्तीचे केले आहे.