अरुण मेहेत्रे, झी मीडिया, पुणे : सोशल मीडियाद्वारे (Social Media) मैत्री करून अश्लील फोटो आणि व्हिडिओची भीती दाखवून खंडणीसाठी (Extortion) धमकावण्याच्या प्रकारात सध्या मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.  पुण्यात (Pune News) सेक्सटॉर्शनमुळे (sextortion) दोन बळी गेल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता थेट राष्ट्रवादीच्या (NCP) आमदारालाच यामध्ये अडकवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी एका आरोपीला अटक केली असून त्याच्याकडून मिळालेल्या माहितीमुळे एकच खळबळ उडाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार यशवंत माने यांच्यासोबत हा सर्व प्रकार घडला आहे. सायबर गुन्हेगाराने सोशल मीडियावरुन माने यांचा फोन नंबर शोधून काढला होता. यानंतर माने यांना सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न आरोपीने केला. जानेवारी महिन्यात माने यांच्या मोबाईल नंबरवर एक अश्लील मेसेज आला. त्यानंतर यशवंत माने यांना अश्लील व्हिडिओ कॉल करून त्यांना भुरळ पाडण्याचा प्रयत्न करण्यात आला. आरोपीने व्हिडिओ कॉल रेकॉर्ड करून सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल करू अशी धमकी देत 1 लाख रुपयांची खंडणी मागितली. 


या सर्व प्रकारानंतर यशवंत माने यांनी थेट सायबर पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. "मी कुठल्या ही व्यक्तीशी बोललो नाही. तसेच मला लागोपाठ 70-80 मेसेज करण्यात आले होते. तसेच 1 लाख रुपयांची खंडणी मला मागितली होती. यामुळे ही तक्रार सायबर पोलिस ठाण्यात दाखल केली होती," असे माने म्हणाले. 


यशवंत माने हे पुण्यात वास्तव्यास असून त्यांनी पुण्यातील सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. यानंतर पोलिसांनी मोबाईल क्रमांकांचा तपास सुरु काढत त्याचा माग काढला. तपासात हा फोन नंबर राजस्थानमधील असल्याचे समोर आले. यानंतर पोलिसांनी एक पथक राजस्थानला पाठवले. पुणे पोलिसांच्या सायबर पोलिसांनी राजस्थान मधील भरतपूर या जिल्ह्यात तब्बल 7 दिवस तळ ठोकला होता. यानंतर पोलिसांना आरोपीला पकडण्यात यश आले. 


दरम्यान, याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव रिझवान खान (24) असून तो राजस्थान मधील आहे. आरोपी खान याने आत्तापर्यंत 80 जणांना असे फोन केल्याचे तपासातून निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी आरोपीकडून आत्तापर्यंत 4 मोबाईल जप्त केले आहेत.