Nikhil Wagle Attack : पुण्यातल्या निर्भय बनो सभेसाठी आलेल्या ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावरील हल्ल्यानंतर राजकीय वातावरण तापलं आहे. निर्भय बनो सभेसाठी आलेल्या ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांची गाडी भाजप कार्यकर्त्यांकडून फोडण्यात आली. तसेच त्यांच्या गाडीवर शाई, अंडी फेकण्यात आली. ही सभा होऊ देणार नाही, असा इशारा भाजपने दिला होता. या हल्ल्यानंतर आता शालेय शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी वागळेंनी नीट बोलावं असा इशारा दिला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी निखिल वागळे यांच्याविरूद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. भाजपचे नेते सुनिल देवधर यांनी फिर्याद दिली होती. वागळेंनी सार्वजनिक शांतता धोक्यात आणणारी पोस्ट जाणिवपूर्वक प्रसारित करुन त्यांची जनमानसातील प्रतिमा मलिन करण्याकरीता बदनामी करुन अवहेलना केली, असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. त्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी पुण्यात कार्यक्रमासाठी आलेल्या निखिल वागळे यांच्यावर हल्ला करत त्यांची गाडी फोडली.


काय म्हणाले चंद्रकांत पाटील?


"पंतप्रधानांबाबत इतक्या खालच्या पातळीवर जाऊन बोलले तर त्यांच्यावर श्रद्धा असलेल्या माणसांकडून प्रतिक्रिया उमटणे स्वाभाविक आहे. हा संताप लक्षात घेऊन वागळेंनी नीट बोलावं, बोलण्याचा पण काही स्तर आहे, पद्धत आहे," असे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं.


पोलिसांनी काय सांगितले?


"राष्ट्रीय सेवा दलाने आयोजित केलेल्या निर्भया बनो कार्यक्रमाला पोलिसांनी परवानगी दिली नव्हती. मी हे जबाबदारीने सांगू शकतो की या कार्यक्रमाला परवानगी नव्हती. पण, निखिल वागळे येणार असल्याने आम्ही मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावला होता. कारण, त्यांच्यावर कालच पुणे शहरांत गुन्हा दाखल झाला होता. गुन्हा दाखल झाल्याने त्यांच्याविरोधात वातावरण असल्याची कल्पना आम्ही त्यांना आधीच दिली होती. त्यांच्यासाठी सुरक्षाही पुरवली होती. ते त्यांच्या खासगी गाडीतून निघाले. त्यांनी पोलीस सुरक्षा घेतली नाही. ते कार्यक्रम स्थळी जायला निघाल्यावर रस्त्यावर कोणीतरी दगडफेक केली. त्यामुळे, सीसीटीव्ही फुटेज पाहून संबंधितांवर कारवाई केली जाईल. आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलं असून विश्रामबाग पोलीस ठाणे आणि डेक्कन पोलिसांकडून याप्रकरणाचा तपास करण्यात येईल," असे पुणे पोलिसांनी सांगितले.


नेमकं काय घडलं?


निखिल वागळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे ज्येष्ठ नेते माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे भाजप कार्यकर्त्यांनी निखिल वागळे यांनी पुण्यात येण्यास विरोध केला होता. तसेच या सभेस परवानगी न देण्याची मागणीही करण्यात आली होती. मात्र शुक्रवारी या सभेसाठी निखील वागळे पुण्यात आल्यानंतर त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. त्यानंतर निखिल वागळे यांच्या गाडीची पुढची काच फोडण्यात आली आणि गाडीवर शाईफेक करण्यात आली.