कुख्यात बाळासाहेब खेडकरचा तुरुंगवासातच मृत्यू, गारवा हॉटेल मालकाच्या हत्येच्या होता आरोपी
Pune Crime : उरळी कांचन येथील प्रसिद्ध गारवा हॉटेलचे मालक रामदास आखाडे यांची दोन वर्षांपूर्वी निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी या प्रकरणी दहा आरोपींनी अटक करुन त्यांची कारागृहात रवानगी केली होती.
सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : पुण्यातील (Pune Crime) गारवा हॉटेलचे (Garwa hotel) मालक रामदास आखाडे खून प्रकरणी आरोपी बाळासाहेब खेडकर याचा मृत्यू झाला आहे. बाळासाहेब खेडकर येरवडा कारागृहात खेडकर शिक्षा भोगत होता. 10 सप्टेंबर रोजी खेडकर याला अर्धांगवायू झाला होता. त्यानंतर त्याच्यावर ससून रुग्णालयात (sassoon hospital) त्याच्यावर उपचार सुरू होते. मात्र बुधवारी सकाळी ससून रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला आहे.
उरुळी कांचन येथील गारवा हॉटेलचे मालक रामदास आखाडे यांच्या खून प्रकरणातील आरोपी बाळासाहेब खेडेकरसह 10 जणांवर 2021 मध्ये मोकका लावण्यात आला होता. उरुळी कांचन येथील गारवा हॉटेलचे मालक रामदास आखाडे यांच्यावर 18 जुलै 2021 रोजी रात्री दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी तलवारीने वार केले होते. या हल्ल्याचा सुत्रधार हा बाळासाहेब खेडेकर होता. मात्र आता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. खेडकर याच्या मृत्यूची न्यायालयीन चौकशी सुरु असून पुढील तपास सुरू आहे.
या हत्या प्रकरणात बाळासाहेब खेडेकर, निखिल खेडेकर, सौरभ ऊर्फ चिम्या चौधरी, अक्षय दाभाडे, करण खडसे, प्रथमेश कोलते , गणेश माने, निखिल चौधरी यांना अटक करुन त्यांच्यावर मकोका लावण्यात आला होता. उरुळी कांचन येथील प्रसिद्ध गारवा हॉटेलचे मालक रामदास आखाडे यांच्यावर अचानक एका तरुणाने येऊन कोयत्याने सपासप वार केले होते. ही सर्व घटना सीसीटीव्हीत सीसीटीव्हीत कैद झाली होती. रविवारच्या दिवशी रात्री पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली होती. . याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात संतोष आखाडे यांनी तक्रार दिली होती.
उरुळी कांचन परिसरात महामार्गावर गारवा हॉटेल आहे. शाकाहारी आणि मांसाहारी जेवणासाठी हे हॉटेल प्रसिद्ध होते. 18 जुलै 2021 रोजी हॉटेलचे मालक रामदास आखाडे हे बाहेर खुर्चीवर बसले होते. फोनवर बोलत असतानाच त्याचवेळी अचानक एक तरुण त्यांच्याजवळ आला. जवळ येताच त्याने शर्टमध्ये लपवलेला कोयता बाहेर काढला आणि आखाडे डोक्यात सपासप वार केले. त्यानंतर रामदास हे खाली कोसळले होते.
आरोपी बाळासाहेब खेडेकर व त्याचा मुलगा निखिल यांचे रामदास आखाडे यांच्या गारवा हॉटेल शेजारी अशोका नावाचे हॉटेल होते. गारवा हॉटेलमुळे खेडेकर यांच्या हॉटेलचा व्यवसाय होत नव्हता. त्यामुळे बाळासाहेब खेडेकर याने त्याचा भाचा सौरभ चौधरी याला आखाडे याचा खून करण्यास सांगितले. त्यानुसार चौधरी याने त्याचा साथीदार नीलेश मधुकर आरते व इतर साथीदारांच्या मदतीने आखाडे यांचा खून केला होता. गारवा हॉटेलचा रोजचा गल्ला दोन ते अडीच लाख रुपये होता.