पुणे : लष्करात नोकरी लावण्याच्या बहाण्याने फसवणाऱ्या माजी लष्करी कर्मचाऱ्याला अटक
Pune Crime News : लष्करात नोकरी लावण्याच्या बहाण्याने अनेक तरुणांना फसवणाऱ्या माजी लष्करी कर्मचाऱ्याला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. यासोबत त्याच्या पत्नीवरही गुन्हा दाखल करण्यात आला. मिलिटरी इंटेलिजन्सकडून मिळालेल्या माहितीवरुन पोलिसांनी ही कारवाई केली आह
सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : लष्करात नोकरी लावण्याच्या बहाण्याने अनेक तरुणांना लाखों रुपयांचा गंडा घालणाऱ्या माजी लष्करी कर्मचाऱ्याला कोंढवा पोलिसांनी जेरबंद केले. दक्षिण कमांडच्या मिलिटरी इंटेलिजन्सकडून मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी लुल्लानगर येथे कारवाई करीत त्याला ताब्यात घेत बेड्या ठोकल्या. त्याच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. याप्रकरणी माजी लष्करी कर्मचाऱ्यासह त्याच्या पत्नीवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर माजी कर्मचाऱ्याला अटक केली आहे.
विनायक तुकाराम कडाळे (रा. गंगाधाम, डीएडी कॉम्प्लेक्स, लुल्लानगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह त्याची पत्नी दीपाली विनायक कडाळे हिच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. कोंढवा पोलिसांनी या दोघांवर 22 जानेवारी रोजी भादवि 420, 34 अन्वये गुन्ह्याची नोंद केली आहे. याप्रकरणी अनिशा साहिल खान (वय 52, रा. कुलउत्सव सोसायटी, खडीमशीन चौक, कोंढवा बुद्रुक) यांनी फिर्याद दिली आहे. आरोपी विनायक कडाळे हा लष्कराच्या कमांड हॉस्पिटलमधून लेखापाल (अकाउटंट-सिव्हिल सर्व्हिस) या पदावरून निवृत्त झालेला आहे. कडाळे याने स्वेच्छा निवृत्ती घेतलेली आहे.
विनायक कडाळे फिर्यादी अनिशा खान यांच्याशी ओळख करून घेतली होती. कडाळे यांनी खान यांना कमांड हॉस्पिटलमध्ये भरती चालू असल्याची बतावणी केली. तिथले कमांडंट आपल्या ओळखीचे असल्याचे सांगत फिर्यादीच्या नातेवाईकांना आणि परिचितांना नोकरी लावतो असे आश्वासन कडाळेने दिले होते. मात्र नोकरीसाठी प्रत्येकी 3 लाख रुपये लागतील असे कडाळेने सांगितले होते. त्यानुसार, आठ जणांकडून विनायक कडाळेने 13 लाख 50 हजार रुपये रोख स्वरूपात मार्च 2021 ते सप्टेंबर 2023 या कालावधीत घेतले.
विनायक कडाळेकडून नोकरीबाबत खात्रीलायक माहिती मिळत नसल्याने तसेच त्यावर शंका येऊ लागल्याने फिर्यादी यांनी त्याच्याकडे पैसे परत मागण्यास सुरुवात केली. त्यावेळी त्याने घेतलेल्या रकमेपैकी 2 लाख 50 हजार रुपये त्यांना परत केले. तसेच फिर्यादीला कोरा धनादेश लिहून दिला. फिर्यादीने हा धनादेश बँकेत जमा केला नाही. उर्वरीत रक्कम परत न करता तसेच कोणालाही नोकरी न लावता फसवणूक केल्याप्रकरणी खान यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली होती. दरम्यान, मिलिटरी इंटेलिजन्सला माहिती कळवण्यात आली होती. त्यांनी देखील आरोपीचा शोध सुरू केला होता.
दुसरीकडे गुन्हा दाखल झाल्याचे समजताच आरोपीने राहण्याचा पत्ता बदलला. मात्र त्याच्याबाबत दक्षिण कमांडच्या मिलेटरी इंटेलिजन्सला 3 मार्च रोजी माहिती मिळाली होती. दरम्यान, याबाबत त्यांनी कोंढवा पोलिसांना याची माहिती दिली. आरोपी कडाळे हा लुल्लानगर चौकात असलेल्या सपना पावभाजी सेंटर जवळ असलेल्या हिल व्ह्यू सोसायटीमध्ये राहत असल्याची पक्की खात्री सहायक पोलीस निरीक्षक लेखाजी शिंदे, पोलीस अमलदार विकास मरगळे, रोहित पाटील यांनी केली. कडाळे हा घरामधून बाहेर पडताना खबरदारी घेत होता. आपली ओळख लपविण्याचा पुरेपूर प्रयत्न करत होता.
त्यानंतर लष्कराचे मिलिटरी इंटेलिजन्सचे एक पथक आणि कोंढवा पोलिसांच्या एका पथकाने सोसायटीच्या बाहेर सापळा लावला. त्यावेळी तो घरात नसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. बराच वेळ त्याची वाट पाहत उभ्या असलेल्या पोलिसांना तोंडाला रुमाल बांधून जात असलेली एक व्यक्ती दिसली. पोलिसांनी छुप्या पद्धतीने त्याचा घरापर्यंत पाठलाग केला. तो घरामध्ये जाताच पाठीमागून आलेल्या पथकांनी त्याला घरात घुसून ताब्यात घेतले आणि त्या अटक करण्यात आली. कडाळेने अशाच प्रकारे आणखी तरुणांना देखील गंडवल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.