सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : एखाद्या चित्रपटाला शोभेल अशी घटना 2019 मध्ये पुण्यातल्या (Pune) पुरंदर तालुक्यातील थापेवाडी इथं घडली होती. कर्ज बाजारी झाल्याने एक व्यक्तीने चक्क स्वत:च्या कारमध्ये दुसऱ्या व्यक्तीला जिवंत पेटवून दिलं आणि स्वत:च्या हत्येचा बनाव रचला. या घटनेचा जवळपास महिनाभर तपास सुरु होता. अखेर पोलिसांनी या प्रकरणाचा पर्दाफाश केला आणि आरोपीला अटक केली.तब्बल तीन वर्षांनंतर शिवाजीनगर न्यायालयाने अखेर आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. विठ्ठल चव्हाण असं जन्मठेप झालेल्या आरोपीचं नाव आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काय आहे नेमकं प्रकरण?
बारामती तालुक्यात राहणारा विठ्ठल चव्हाण हा कर्जबाजारी झाला होता. या कर्ज बाजारी पणाला तो कंटाळला होता. त्याची विनायक उर्फ पिंटू ताराचंद या व्यक्तीशी ओळख झाली. ताराचंद याला दारूचे व्यसन होतं. याच गोष्टीचा फायदा घेत विठ्ठल चव्हाण याने त्याला अनेकदा दारू पाजत त्याचा विश्वास संपादन केला. 


एका दिवशी विठ्ठल चव्हाण याने विनायक ताराचंदला भरपूर दारू पाजली आणि त्याला नशेतच पुरंदर तालुक्यातील थापेवाडी इथं आणलं. त्यानंतर विठ्ठलने त्याला आपले कपडे घातले आणि त्याला स्वत:च्या कारमध्ये टाकून कार पेटवून दिली. यानंतर विठ्ठल चव्हाण घटनास्थळावरुन फरार झाला. सुरुवातील विठ्ठल चव्हाण याचाच कारमध्ये जळून मृत्यू झाल्याचं सर्वांना वाटलं.


पण पोलिसांना याप्रकरणाचा संशय आला. त्यांनी सखोल तपास केला आणि मुख्य आरोपीला ताब्यात घेतलं. भरपूर कर्ज झाल्याने आपल्याला कोण त्रास देऊ नये यासाठी विठ्ठल चव्हाण याने ही हत्या केली. आज तीन वर्षानंतर विठ्ठल चव्हाणला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली असून तीन लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.