Pune News Today: नामांकित आयटी कंपनीत अभियंता म्हणून काम करणार्‍या तरुणीवर बंदूकीच्या धाकाने बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी, राहुल चंद्रकांत यादव (वय.32,रा. सोना अपार्टमेंट औंध रोड) याच्या विरुद्ध चतुःश्रृंगी पोलिसांनी बलात्कार, जीवे मारण्याची धमकी, आर्म अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 24 जुन 2023 रोजी रात्री दहा वाजताच्या सुमारास बाणेर येथील एका हॉटेलवर ही घटना घडली असल्याची तक्रार ३० वर्षीय तरुणीने दिली आहे. लग्न जमवणाऱ्या एका संकेतस्थळावरुन पिडीत तरुणीची आरोपीसोबत ओळख झाली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी आयटी कंपनीत नोकरी करते. ती अविवाहीत असून तिने आपला बायोडेटा एका या संकेतस्थळावर टाकला होता. 


आरोपी राहुल याने तेथून तरुणीसोबत संपर्क केला. त्याने तरुणीसोबत लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यातून दोघे बालेवाडी परिसरात भेटले. तरुणीचा राहुल याच्यावर विश्वास निर्माण झाला. पुढे फोनवर बोलण्याबरोबरच घरी जाणे येणे सुरु होते. 24 जुन रोजी राहुल हा तरुणीला बाणेर येथील एका हॉटेलवर घेऊन गेला. तेथे त्याने बंदूकीच्या धाकाने तरुणीवर बलात्कार केला, असा आरोप तिने तक्रारीत केला आहे. 


या प्रकरणावरुन तरुणी आणि राहूलमध्ये वाद झाला होता. त्यावेळी त्याने तरुणीची माफी मागून लग्न करणार असल्याचे सांगितले. जुलै 2023मध्ये राहुल याने तिला लग्न करणार असल्याचे वचन दिले होते. काही कालावधी लोटल्यानंतर तरुणीने परत राहुल याच्याकडे लग्नाचे विचारले असता, त्याने परत उडवा-उडवीची उत्तरे दिली. त्यातून दोघांमध्ये वाद झाला, असं तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे. 


31 जुलै रोजी परत तरुणीने राहूल याला लग्नाबाबत विचारले असता त्याने नकार देऊन शिवीगाळ केली. तसेच पोलिसात तक्रार केली तर बरे वाईट कण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान हा प्रकार घडल्यानंतर तरुणीने सुरुवातीला कोंढवा पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानंतर पुढील तपासासाठी हा गुन्हा चतुःश्रृंगी पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.