अरुण मेहेत्रे, झी मीडिया, पुणे : कधीकाळी शांत सुरक्षित समजलं जाणार पुणे शहर आज अशांत असुरक्षित वाटू लागलंय. त्याचं कारण म्हणजे शहरात वाढत असलेली गुन्हेगारी. ओठांवर मिसरूडही न फुटलेली पोरं वाटेल तिथं बिनधास्त कोयते नाचवतात. भर रस्त्यात, भर चौकात, भर दिवसा अशा घटना घडतात. त्यामुळे पुण्यात कधी शरीरांवर वार तर कधी गाड्यांची तोडफोड होताना दिसत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या वर्षभरात अशा अनेक घटना शहराच्या वेगवेगळ्या भागांत घडल्या आहेत, आजही घडत आहेत. या घटनांमुळे सर्वसामान्य नागरिक भयभीत आहेत तर पोलीस अक्षरशः हवालदिल झाले आहेत. गुन्हेगारीला पायबंद घालण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्नच होत नाहीत असं अजिबात नाही. मात्र त्या प्रयत्नांना अपेक्षित यश मिळत नाही हेही खर आहे. अगदी बाजारामध्ये कोयत्यांच्या विक्रीला बंदी घालण्यापासून ते कोयता गँगची धिंड काढण्यापर्यंत असे अनेक उपाय करून झालेत. कठोरात कठोर उपाय म्हणजे गुन्हेगारांच्या टोळीला मोक्का लावणे. वर्षभरात शंभर पेक्षा जास्त टोळ्या मोक्काखाली जेरबंद करण्यात आल्या आहेत. 


इतकच नाही, तर कर्तव्यात कसूर करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या, काहींना निलंबितही करण्यात आलं.  मात्र एक टोळी आत गेली की दुसरी डोकं वर काढते असं काहीतरी घडताना दिसतय. शहरातील गुन्हेगारी आणि एकूणच कायदा सुव्यवस्थेचा विचार केला तर कोयता गॅंगची दहशत हा केवळ एक घटक आहे.  आर्थिक गुन्हे, जमीन बळकावण्याचे प्रकार यांसह अमली पदार्थांचा विळखा या बाबी चिंतेचा विषय बनल्या आहेत. अशा परिस्थितीत शहराच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या पोलीस यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्याशिवाय राहत नाही.


त्यामुळे शहरात फिरताना कधी कोण कुठलं हत्यार काढेल आणि किरकोळ कारणाने डोक्यात घालेल हे काही सांगता येत नाही. आज वर्ष संपत आलं आहे. असं असताना पुणेकरांना 2023 साल लक्षात राहील ते अशाच घटनांनी. येणार नवीन वर्ष पुणेकरांची या साऱ्यातून मुक्तता करणार ठरो हीच अपेक्षा आता नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.